अवकाळी कोसळलेल्या पावसाने शेतकरी, आंबा बागातदारांच्या नुकसानात भर

अवकाळी कोसळलेल्या पावसाने दापोली मंडणगडात शेतकरी, आंबा व काजू बागायतदरांचे खुप मोठे नुकसान होणार असल्याने ते चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणाच्या नुकसानीचा एकुणच फटका हा शेतकरी आंबा काजू बागायतदारांना अधिक बसणार आहे. त्यामुळे मंडणगड तसेच दापोलीतील आंबा बागातदार हे फार चिंतेत आहेत.

दापोलीत रविवारी 14 एप्रिल रोजी दाट धुक्याची दुलई पसरली होती त्यामुळे हवेत वाढलेल्या उष्म्याने नाही म्हटले तरी सगळीकडेच गारवा जाणवत होता. ही घटना 14 एप्रिल रविवारची होती त्याच्या दुस-याच दिवशी सोमवारी 15 एप्रिल रोजी सायंकाळी दापोलीत पावसाने आपली जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या शेतकरी आंबा काजू बागायतदारांना नुकसानीची चिंता लागली असतानाच परत दुस-या दिवशी मंगळवारी पावसाने पुन्हा रात्री आपली हजेरी लावून सर्वांचीच दाणादाण उडवली सलग दोन दिवस अवकाळी पावसाची बरसात ही शेतकरी आंबा काजू बागातदारांचे आर्थिक नुकसान करण्यास पुरेशी ठरली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रावर 17 एप्रिलला पडलेल्या पावसाच्या पर्जन्यमानाची 8.6 मि.मी अशी नोंद झाली असून आतापर्यंत एकुण पर्जन्यमान हे 9.9 मि.मी. असल्याची नोंद नोंदवण्यात आलेली आहे.दापोलीत कधी धुक्याची दुलई पसरते तर कधी कडक उन्हाचा तडाखा जाणवतो तर कधी अवकाळी पावसाची बरसात होते हा वातावरणातील बदलाचा लपंडाव असल्याने निश्चितपणे शेतकरी बागायतदारांची धास्ती वाढवणारा आहे. रविवारी 14 एप्रिल रोजी दापोलीत पसरलेल्या दाट धुक्याच्या दुलईने पाऊस लांबल्याची चिन्ह होती. त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त भागातील गावांची तहान ही लांबणार होती. असे चित्र निर्माण झालेले असताना अचानकपणे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना आटलेल्या विहीरींना पाण्याच्या पाझर फटून काही प्रमाणात दिलास मिळेल अषा आशेचे चित्र असताना दुसरीकडे मात्र अचानकपणे कोसळलेल्या पावसाने मात्र दाणादाण उडवली कारण बांधकाम व्यवसायिकांनी तसेच आपल्या घरांच्या बांधकामांचे काम करणाऱ्यांनी बांधकामासाठी आणून उघडयावर ठेवलेल्या सिमेंटच्या पिशव्या भिजण्याचे प्रकार घडले, काहींनी मांडवावर वाळत टाकलेली सुपारी भिजली तर काहींचे वाल चवळींची वाळवण भिजली. त्यामुळे बांधकाम व्यवसायिक हे अडचणीत आले. तसे वाळण भिजल्याने शेतकरीही नुकसानीत गेले. त्यात अनेकांनी बाहेर उघडयावर ठेवलेली गुरांची वैरण जसे गवत पेंडा हे भिजल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. असे असतानाच सलग दुस-या दिवशी परत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आंबा बागायतदार हे हवालदिल झाले आहेत.

आंबा बागायतदारांनी महागड्या औषधांची फवारणी करून डोक्यावर कर्जाचा डोंगर घेतला आहे. मात्र पावसाने त्यांची आशा ही फोल ठरवली असून नुकसानग्रस्त बागायदारांना चिंता सतावत आहे. कारण अवकाळी पावसाने आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे महागडी औषधांची बॅका, पतसंस्था सोसायटया आदी वित्तसंस्थाकडून घेतलेली कर्ज परतफेड कशी करावयाची याची त्यांना चिंता सतावत आहे. सध्या देशाच्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जारी आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आश्वासने देणे शक्य नाही तर दुसरीकडे अधिकारी प्रशासनालाही काही अडचणी आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाचे पंचनामे करण्याचे काम झाले नाही तर नुकसान भरपाई मिळणार कशी असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकरी आंबा काजू बागायतदार हे हाता तोंडाशी आलेला घास हा हिरावून जाण्याच्या या प्रकाराने कोंडीत सापडला आहे.