हिंदुस्थानच्या मेरी गोम्सला विजेतेपद

यजमान हिंदुस्थानची महिला ग्रॅण्डमास्टर मेरी एन. गोम्स हिने वेलामल एआयसीएफ महिला ग्रॅण्डमास्टर राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. मंगोलियाच्या एंखतुल अल्तान हिने उपविजेतपदाला गवसणी घातली, तर हिंदुस्थानच्या वेलपुला सरायु हिला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मेरी एन. गोम्सने हिने दहाव्या फेरीअखेरच विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलेले होते, मात्र तिने 11 व्या फेरीतही दमदार विजय मिळवित रुबाबत जेतेपदावर मोहोर उमटविली. मेरी एन. गोम्सने अखेरच्या लढतीत आपलीच देशसहकारी मौनिका अक्षया हिचा एकूण 39 चालीत पराभव करीत सर्वाधिक 9 गुणांची कमाई करीत विजेतेपद जिंकले. तिला अडीच लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मंगोलियाची एंखतुल अल्तान व हिंदुस्थानची वेलपुला सरायु यांच्यात दुसऱया उपविजेतपदासाठी जबरदस्त रस्सीखेच होती. दोन्ही खेळाडूंनी अखेरच्या फेरीत विजय मिळवित प्रत्येकी 7.5 गुणांची कमाई केली, मात्र उत्कृष्ट टायब्रेकच्या आधारे एंखतुल अल्ताना ही उपविजेती ठरली. तिला दीड लाख रुपयांचे पारितोषिक देऊन, तर सरायुला एक लाख 30 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

अंतिम फेरीत इतर लढतीत मंगोलियाच्या उर्तशेख उरीइनतुया  हिने हिंदुस्थानच्या महालक्ष्मी एम. हिचा पराभव केला. दुसरीकडे इटलीची एलेना सेदिना व हिंदुस्थानची मोनिषा जिके आणि कोलंबियाची एंजेला फ्रोंको व फ्रान्सची नीनों मैसूरदजे यांच्यातील लढती ड्रॉ झाल्या.