लोकलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दादर ते अंधेरीदरम्यानची घटना

धावत्या लोकलमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नूर अहमद शबीर अन्सारी या प्रवाशाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुह्यात त्याला लवकरच अटक केली जाणार आहे.

पीडित मुलगी ही पश्चिम उपनगरात राहते. तिला एका आजाराने ग्रासले आहे. दोन दिवसांपूर्वी ती वडिलांसोबत परळ येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचार झाल्यावर रात्री ती दादर रेल्वे स्थानकात आली. फलाट क्रमांक 5 येथून तिने घरी जाण्यासाठी लोकल पकडली. ती वडिलांसोबत पुरुषांच्या डब्यात शिरली. मुलीला तिसरी सीट मिळाली. तर समोरच्या सीटवर तिचे वडील बसले होते. लोकल दादरहून वांद्रेच्या दिशेने जात असताना नूर हा तेथे आला. चौथी सीटवर बसायचे सांगून त्याने मुलीला नकोसा स्पर्श केला. हा प्रकार मुलीच्या लक्षात आला. तिने याची माहिती तिच्या वडिलांना दिली. वडिलांनी नूरला जाब विचारला.

तेव्हा नूरने मुलीच्या वडिलांसोबत वाद घातला. डब्यात प्रवास करणाऱया प्रवाशांनीदेखील नूरला जाब विचारला. नूरने काही प्रवाशांसोबत उद्धट वर्तन केल्याने त्याला प्रवाशांनी चांगलाच चोप दिला. लोकल अंधेरी स्थानकात आल्यावर प्रवाशांनी नूरला पकडून अंधेरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी झालेल्या नूरला पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या वडिलांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नूरविरोधात गुन्हा नोंद केला. रुग्णालयातून सुट्टी मिळताच नूरला अटक केली जाणार आहे.