कोकण पदवीधर मतदार नोंदणी गोंधळाबाबत खासदार विनायक राऊत कोकण आयुक्तांची भेट घेणार – वरूण सरदेसाई

कोकण पदवीधर मतदार नोंदणीमध्ये प्रशासनस्तरावर गोंधळ सुरू आहे.अनेक जाचक अटींमुळे पदवीधर मतदार नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कोकण आयुक्तांची भेट घेऊन मतदार नोंदणी सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सचिव वरूण सरदेसाई यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कोकण दौरा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विविध तालुक्यात बैठका घेण्यात आल्या. रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार विनायक राऊत, सचिव वरूण सरदेसाई, उपनेते आमदार राजन साळवी, कोकण पदवीधर निवडणूक प्रमुख किशोर जैन,जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, उपजिल्हाप्रमुख ॲड.सुजित कीर, संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, तालुका महिला संघटक साक्षी रावणंग, शहरसंघटक मनिषा बामणे उपस्थित होत्या.

बैठकीनंतर सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोकण पदवीधर मतदार नोंदणी सुरू असून सर्वच तालुक्यात आपण आढावा बैठक घेत आहोत. बैठकींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. बैठकीमध्ये आमच्या लक्षात आले की,पदवीधर मतदार नोंदणीबाबत प्रशासन स्तरावर प्रचंड गोंधळ आहे. काही जाचक अटीमुळे नोंदणीत अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ कोकण आयुक्तांची भेट घेऊन या जाचक अटींबाबत माहिती देऊन मतदार नोंदणी सुरळीत कशी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे, असे वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

सरकार भीतीमुळे निवडणूका टाळत आहे
पदवीधर मतदारांसमोर आपला निभाव लागणार नाही याची सरकारला भीती वाटतेय.त्यामुळेच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक थांबवली.पदवीधर मतदारसंघातही आपला निभाव लागणार नाही याची सरकारला भीती वाटते आहे.म्हणूनच ते निवडणूका टाळत आहेत. त्यांना माहिती आहे की पदवीधर मतदारांच्या मनात शिवसेनाच (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आहे, सरदेसाई यांनी सांगितले.

कातळशिल्प वगळून रिफायनरी करायची तर देवगडात जावे लागेल
कातळशिल्प वगळून रिफायनरी करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, कुणी उंटावरून शेळ्या हाकू नयेत.कातळशिल्प कुठे-कुठे पसरली आहेत ती जाऊन पाहिलीत का? जर कातळशिल्प वगळून रिफायनरी करणार अशा कुणी वल्गना करत असेल तर रिफायनरीसाठी देवगडात जावे लागेल. कुणी रिफायनरीबाबत वल्गना केल्या तरी रिफायनरी प्रकल्प स्थानिक ग्रामस्थ होऊ देणार नाहीत आणि आम्ही स्थानिक ग्रामस्थांसोबत आहोत असे राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना सुनावले.