धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या किंमती ऐवजाची चोरी; सराईत चोरटा गजाआड, साडेचार लाखाचे दागिने हस्तगत

बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांच्या पर्स अथवा बॅगेतील किंमती ऐवज शिताफिने लंपास करणाऱ्या टोळीचा एक सराईत आरोपी आझाद मैदान पोलिसांच्या हाती लागला आहे. चोराकडून एका गुन्ह्यातील चार लाख 48 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळाले आहे.

कफ परेड येथे राहणारे जयंता पुजारी (47) हे 27 मार्च रोजी दुपारी कुलाबा बस डेपो ते डी.एन. मार्गावरील पिके वाईन समोरील बस स्टॉप असा प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान अज्ञात व्यक्तीने पुजारी यांच्या बॅगेतील सोने व हिरे असा चार लाख 48 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. धावत्या बसमधून अशा प्रकारे प्रवाशाच्या बॅगेतील ऐवज चोरीला गेल्याने आझाद मैदान पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक लिलाधर पाटील तसेच कटरे, हिरे, पाटील, कीर्तीकर, मुंढे या पथकाने तपास सुरू केला. सीसीटिव्ही फुटेज व खबऱ्यांच्या मदतीने पोलीस शोध घेत असताना लिलाधर पाटील यांना सदर गुन्ह्यातला आरोपी पवई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पवईत साफळा रचला आणि मोहम्मद शमीम यामीन कुरेशी या आरोपीला पकडले. त्याच्याकडून चोरीचा सर्व ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात  एल. टी. मार्ग, भायखळा, कुलाबा, ताडदेव, भोईवाडा, पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कुरेशी हा लोकांना दाखविण्यासाठी फळ विकायचे काम करत होता. पण बेस्ट बसमध्ये गर्दीच्या तो अन्य साथीदारांसह प्रवाशांच्या बँगेतील किंमती एवज, रोकड चोरायचे काम करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या अन्या साथीदारांचा शोधा घेतला जात आहे.