जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये भूकंपाचे मध्यम धक्के; रिश्टर स्केलवर 5.5 तीव्रतेची नोंद

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सोमवारी दुपारी 3.38 च्या सुमारास भूकंपाचे मध्यम धक्के जाणवले. जम्मू, श्रीनगर, पुंछ, किश्तवाडसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरने सांगितले की, रिश्टर स्केलवर या भूंकपाची तीव्रता 5.5 एवढी नोंदवण्यात आली आहे. याघटनेने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाचे केंद्र लडाखमधील कारगिल प्रदेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी सांगितले की त्यांना दोनदा भूकंपाचे हादरे जाणवले. दुसरा धक्का पहिल्यापेक्षा कमी तीव्र होता. भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक ठिकाणी लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले. या धक्क्यामुळे काहीवेळ नागरिक दहशततीत होते. या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि त्याचा दाब वाढल्यावर भूकंप होतो.