‘ चला पळा…आपापल्या घरी…चालते व्हा…’ हेच माझे भाषण; सभेत कमी गर्दी बघताच मंत्रीमहोदय संतापले…

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी- विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभेसाठी प्रचंड गर्दी होत आहे. तर काही सभांकडे जनता सपशेल पाठ फिरवत आहे. जनतेने आपल्या सभेकडे पाठ फिरवल्याने राजस्थानात भाजपचे मंत्रीमहोदय संतापले. त्यांना संताप अनावर झाला आणि ‘ चला पळा.. आपापल्या घरी…चालते व्हा…’ हेच माझे भाषण आहे, असे तावातावाने म्हणत ते निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची चर्चा होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्षाचे नेते गुंतले आहेत. तसेच सत्तेत असलेले अनेक मंत्री वेळ काढून प्रचारसभा घेत आहेत. मात्र, राजस्थानमधील कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मीणा यांचे आणि भाजपचे चांगलेच हसे झाले आहे. त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. मंत्री मीणा यांचा प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेला गर्दी नसल्याने किरोडीलाल मीणा प्रचंड संतापले आणि रागाच्या भरात व्यासपीठावरून निघून गेले. व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर मंत्र्यांची कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाली आणि त्यांच्या रागात तेल ओतले गेले. संतपाच्या भराच मीणा म्हणाले ‘ चला पळा…आपापल्या घरी…चालते व्हा…’ हेच माझे भाषण आहे. अशा ठिकाणी मला भाषणच करायचे नाही. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गर्दीही जमावता येत नाही, असे कार्यकर्त्यांना सुनावत ते निघून गेले. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मंत्री किरोडीलाल मीणा हे बस्सीच्या खोरी बालाजी मंदिराजवळ दौसा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कन्हैयालाल मीणा यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी आले होते. मात्र, सभेला गर्दी नसल्याने मंत्री किरोडीलाल मीणा संतापले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशी सभा घेतल्याची…चला पळा.. आपल्या आपल्या घरी जा, हेच माझे भाषण आहे, चलो… भागो… हटो..असे म्हणत ते निघून गेले.