पैसे नसल्याने निवडणूक लढवणार नाही, ‘अर्थमंत्री’ निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी सातवी यादी जाहीर केली. दरम्यान, निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे आपल्याकडे नसून ती जिंकण्यासाठी जाती-धर्मासारख्या विषयांचा आधार घेतला जात असल्याने ही निवडणूक आपण लढवणार नसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. टाईम्स नाऊ समिट या कार्यक्रमात बोलताना सीतारमण यांनी हे विधान केलं आहे.

निर्मला सीतारमण या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, मला पक्षाच्या अध्यक्षांनी लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी विचारलं होतं. या निवडणुकीसाठी दक्षिण हिंदुस्थानमधील एका जागेचा प्रस्तावही देण्यात आला होता. आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडू यापैकी एका जागेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, दहा दिवस मी विचार केला आणि निवडणूक न लढवण्याचा निश्चय केला, असं सीतारमण यावेळी म्हणाल्या.

ज्याप्रकारे निवडणुकीत पैसे खर्च केले जातात, तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. तसंच, निवडणुकीत जात किंवा धर्माचा आधार घेऊन जिंकलं जातं हेही मला खटकतं. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यास नकार दिला, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं.