रामलल्लाचा पहिला सूर्यतिलक; चार मिनिटे भाळी चमकली किरणे

राम नवमीच्या शुभदिनी आज दुपारी 12 वाजल्यापासून रामलल्लाचा सूर्यतिलक सुरू झाला. प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरचा हा पहिला सूर्यतिलक असून रामलल्लाच्या भाळी चार मिनिटे सूर्याची किरणे चमकली. सूर्यतिलक करण्यासाठी अष्टधातूच्या 20 पाईपपासून 65 फूट लांबीची यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात गर्भगृहातून रामलल्लाच्या भाळी 4 लेन्स आणि 4 आरशांद्वारे किरण पाठवण्यात आले.

राम नवमीनिमित्त आज पहाटे साडेतीन वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. रोज हे दरवाजे सकाळी साडेसहा वाजता उघडतात. जगद्गुरू राघवाचार्य यांनी प्रभू श्रीरामाचा 51  कलशांनी अभिषेक केला.

 असे पोहोचले सूर्यकिरण

सूर्यप्रकाशाची पहिली किरणे राममंदिराच्या तिसऱया मजल्यावरील आरशावर पडली. तिथून प्रकाशकिरणे परावर्तित होऊन पितळेच्या पाईपमधील आरशावर पडली. त्यातून सूर्यप्रकाश पुन्हा 90 अंशात परावर्तित झाला. पितळेच्या पाईपमधून किरणे तीन लेन्समधून परावर्तित झाली. त्यानंतर ही सूर्यकिरणे लंबवर्तुळाकार पाईपमधून परावर्तित झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱयात बसविण्यात आलेल्या आरशावर पडली. तिथून ती किरणे परावर्तित होऊन रामलल्लाच्या भाळी 75 मिमीचा गोलाकार सूर्यतिलक झाला

सूर्यतिलक सोहळा सुरू असतानाच भाविकांना मंदिरात सोडण्यात आले. तसेच मंदिराच्या बाहेरही हा सोहळा भाविकांना पाहता यावा यासाठी मंदिर ट्रस्टकडून 100 एलईडी स्क्रीन लावण्यात आले, तर पेंद्र सरकारने 50 एलईडी स्क्रीन लावले होते.