पाकड्यांच्या उलट्या बोंबा; लाहोरमध्ये प्रदूषण वाढले, हिंदुस्थानविरोधात सुरू केला कांगावा

दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना आर्थिक मदतीसोबत प्रोत्साहन देणे, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलीन झाली आहे. तसेच डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पाकड्यांकडे त्यांच्या मित्रराष्ट्रांनीही पाट फिरवली आहे. अशी परिस्थिती झाली असतानाही पाकड्यांचे शेपूट वाकडेच आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा दोष त्यांनी हिंदुस्थानला देत पंजाबमध्ये तण जाळले जात असल्यानेच लाहोरमध्ये प्रदूषण वाढल्याचा कांगावा त्यांनी सुरू केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच पाकडे पुन्हा तोंडावर आपटले आहेत.

पंजाब, गाझियाबाद आणि उत्तर प्रदेशात दिवाळीच्या आधी तण जाळण्यात येत असल्याने नवी दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील प्रदूषणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होते. यंदा पाकिस्तानातील लाहोरमध्येही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. या मुद्द्यावरूनही पाकड्यांनी पुन्हा हिंदुस्थानविरोधी सूर आवळला आहे. पंजाबमध्ये जाळण्यात येणाऱ्या तणांमुळेच पाकिस्तानात प्रदूषण वाढल्याचा कांगावा त्यांनी सुरू केला आहे. मात्र, लाहोरमध्येच मोठ्या प्रमाणात तण जाळले जात आहेत. यावर पाकिस्तान मग गिळून गप्प आहे.

पाकिस्तानात मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हिंदुस्थानातील पंजाबमध्ये तण जाळले जात असल्याने लाहोरमध्ये प्रदूषण आणि धुरके वाढल्याचे सांगण्यात आले. तसेच या मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याबाबतही चर्चा झाली. धोकादायक वायु गुणवत्ता म्हणजेच एक्यूआयमुळे लाहोर प्रदूषित शहरांमध्ये आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय वायू तपासणी मंडळाने हिंदुस्थानात जाळण्यात येणाऱ्या तणांचा आणि लाहोरमधील प्रदूषणाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. प्रदूषण हे स्थानिक समस्यांमुळे होते. तसेच पंजाबमधून लाहोरच्या दिशने हवा वाहत नसल्याने याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकडे पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहेत.