आरएसएसनेच मला निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये पाठवलं होतं, भाजप नेत्याचा दावा

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, भाजपच्या एका नेत्याने केलेल्या विधानावरून एकच खळबळ उडाली आहे. या नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच थेट आरोप करत पक्षांतर करायला लावल्याचं म्हटलं आहे.

एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं आहे. हा नेता म्हणजे मध्य प्रदेशमधील भाजप नेता रामकिशोर शुक्ला आहेत. शुक्ला यांनी हा दावा केला आहे की, मी मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये गेलो होतो. मी काँग्रेसच्या तिकीटावर महू येथून निवडणूक लढवली आणि पराभूत झालो. ही एक राजकीय खेळी होती. ही खेळी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून मी खेळलो, अशी कबुली शुक्ला यांनी दिली आहे.

शुक्ला यांनी पराभवानंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, भाजप उमेदवार उषा ठाकूर या कमकुवत उमेदवार होत्या. त्यांना पक्षातूनच प्रचंड विरोध झाला होता. माजी काँग्रेस आमदार अनंत सिंह दरबार हे अपक्ष निवडणूक लढवत होते आणि याच समीकरणाकडे पाहून आपण हा निर्णय घेतल्याचं शुक्ला यांचं म्हणणं आहे. जेव्हा त्यांना संघाच्या या नेत्याचं नाव विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे इंदूर विभागाचे संघटना मंत्री अभिषेक उडानिया यांचं नाव घेतलं आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच आपण काँग्रेसमधून लढलो, असा दावा शुक्ला यांनी केला आहे.