रावेरमध्ये भाजपांतर्गत वाद चव्हाट्यावर, रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर पदाधिकारी नाराज

भाजपने जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, काहींनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली असताना आता भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे व पदाधिकार्‍यांमध्ये मोठा वाद झाल्याचे समोर आले आहे. तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीतील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात एकनाथ खडसेंचे नाव घेता मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही, असे पदाधिकार्‍यांनी रक्षा खडसेंना विचारले व रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. त्यांच्या गाडीत तुतारीची लोक असतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर यासंदर्भात उघड नाराजी पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. नाराज पदाधिकार्‍यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसे यांना खडेबोल सुनावले. दरम्यान, या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते आणि रक्षा खडसे यांच्यात खडजंगी सुरु असताना गिरीश महाजन कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह तसेच रक्षा खडसे यांच्या विरोधात पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी समोर आली आहे. बैठकीला आमदार, पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती असल्याचे व्हिडीओत दिसत आहेत.