वाचावे असे काही – फुलांच्या जन्मकथा 

>> धीरज कुलकर्णी

लोककथा या जगभरात त्या त्या संस्कृतीची एक ओळख असतात. जगभरातील वेगवेगळ्या प्रांतांत असलेल्या या लोककथा कोणी रचल्या, कुणाला ठाऊक नाही. वेदांप्रमाणेच हे वाङ्मयही अपौरुषेय.

सुप्रसिद्ध रशियन लेखिका अन्ना साक्से यांनी लिहिलेल्या फुलांच्या जन्मकथा यांना मात्र रशियन वाङ्मयात लोककथेचा दर्जा प्राप्त झाला. बहुधा जगभरात असे एकच उदाहरण असावे. मराठीत याचा अनुवाद ‘फुलांचे बोल’ या नावाने रशियन भाषा तज्ञ डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांनी केला आहे. पुस्तक स्वरूपात प्रकाशित होण्यापूर्वी या कथा लेखमाला म्हणून दै. ‘सामना’च्या ‘फुलोरा’ पुरवणीत प्रकाशित झाल्या. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला थोर कवयित्री शांताबाई शेळके यांची सुंदर प्रस्तावना आहे.

फुलांच्या या जन्मकथेची कहाणीही मजेशीर आहे. लेखिका अन्ना साक्से रेल्वेने एका ठिकाणी उतरल्या. मात्र त्यांना न्यायला जे येणार होते, ते गाडी घेऊन आलेच नाहीत. त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी साक्सेबाई चालत निघाल्या. ही वाट रानावनातून जाणारी होती. अतिशय सुंदर फुले सगळीकडे फुललेली होती. त्यामुळे लेखिकेचे मन मोहरून आले. फुले जणू तिच्याशी बोलू लागली. तिला आपल्या कथा सांगू लागली. स्त्रीच्या  मनाने या कथा स्त्राrप्रमाणे ऐकल्या आणि लिहिल्या. एकूण अठ्ठावीस फुलांच्या जन्मकथा इथे निवेदन केलेल्या आहेत.

‘फुलांचे बोल’मधल्या काही कथांतून मानवी जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे खरे, पण त्या मूलत परिकथा आहेत. काही कथांत मीलनाचा आनंद आहे, काहींमध्ये चिरवियोगाचे दुःख आहे. कुठे कुटुंबप्रेम, कुठे अपत्य वात्सल्य, कुठे त्याग, कुठे अपार वेदना सोसण्याची शक्ती अशा विविध भावनांची चित्रे इथे बघावयास मिळतात आणि शेवटी या अद्भुतरम्य कथांमधूनही मानवी संसाराचेच रंग उमटलेले आहेत असे आपल्या प्रत्ययाला येते. म्हणून त्या वाचताना आपल्याला हान्स अँडरसन, ग्रिम बंधू यांच्या परिकथांचे स्मरण होते. या कथांचे विश्व अद्भुतरम्य आहे. निसर्गातील पशुपक्षी, झाडे इत्यादी यांची विविध भाववृत्तींची दुनिया आपल्याला मोहून टाकते.

आपल्याकडे विष्णुशर्मा यांनी रचलेल्या ‘पंचतंत्र’ कथांप्रमाणे लहान मुले तसेच मोठय़ा माणसांनाही या कथा आवडतील. डॉ. सुनीती देशपांडे यांनी या मूळ कथांचे केलेले भावानुवाद मूळ भावसौंदर्याचा प्रत्यय आणून देतात. अनेक कथांमध्ये जीवनदर्शन घडवणारी काही सुंदर, सुभाषितवजा वाक्ये आहेत

हिंदुस्थानातील हिंदू संस्कृतीत पानेफुले, प्राणी इत्यादींना फार महत्त्व आहे. आपल्या दैवतांना पूजेसाठी वेगवेगळी फुले हवी असतात. गणपतीला जास्वंद, केवडा, विठ्ठलाला तुळशीची मंजिरी, हनुमंताला रुईफुलांची माळ, तर शंकराला धोत्र्याचे फूल वाहिले जाते. शमी, बेल, वड, पिंपळ यांना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.

आपल्याकडे वारांच्या कहाण्या लोकप्रिय आहेत. या प्रतीकात्मक कहाण्यांमधून लोक संस्कृती, मानवी जीवन, नातेसंबंध यांची वीण जशी दिसते, तशीच ‘फुलांचे बोल’ यामधील कथांमधून नियतीची चेष्टिते बघावयास मिळतात. लोभ, स्वार्थ, मत्सर या दुर्गुणांना बळी पडून कथांमधील फुले दुःखास प्राप्त होतात. ‘पिओनी’ कथेत कौटुंबिक जबाबदारीमुळे प्रेमपूर्तीच्या आनंदाला पारखी झालेली पिओनी आपल्याला दिसते.

‘कक्कू फ्लॉवर’ या फुलाच्या जन्मकथेतही प्रत्यक्ष जगातील घटनांचा पडसाद उमटला आहे. तरुण कक्कू मिळेल त्या तरुणाशी प्रेमाचे चाळे करते, पण त्यातून झालेल्या अपत्यांची जबाबदारी टाळते. वृद्धत्वात मात्र ती मुले तिची जबाबदारी नाकारतात. तिची एकच मुलगी तिला “आई” म्हणून हाक मारते. याचा आनंद होऊन तिच्या डोळ्यांतून आसवे गळतात. त्या आसवांची जी फुले होतात, ती कुक्कूची फुले.

परिकथा या स्वतंत्रपणे रंजक असतात. त्याबरोबरच निसर्ग, पशुपक्षी यांबद्दल त्या आपल्याला अधिक संवेदनाक्षम करतात. या अर्थाने त्या जागतिक असतात. म्हणूनच लॅटवियातील अन्ना साक्से यांनी लिहिलेल्या या कथा मराठी मनालाही भावतात आणि आपण तन्मय होऊन जातो. रशियन भाषेत अनुवादित झालेल्या या कथा मराठीत आणून डॉ. सुनीती देशपांडे यांनी आपल्याकडचे परिकथा विश्व समृद्ध केले आहेच, पण आजच्या पर्यावरण काळातही या कथांचे मोल मोठे आहे.
 [email protected]