साहित्य जगत – नव्याने लक्ष जाण्यासाठी 

>>रविप्रकाश कुलकर्णी

रोज काहीतरी घडत असते आणि बिघडतही असते. त्यालाच इतिहास म्हणतात. ज्याची नोंद होते, त्याच्या खाणाखुणा तरी राहतात. बाकीच्या गोष्टी विस्मरणात जातात. हे विस्मरण टळावे म्हणून निमित्तानिमित्ताने स्मरण करायचे असते. 12 जानेवारी 2024 रोजी अशाच एका विस्मरणात गेलेल्या कर्तृत्वान माणसाची आठवण केली गेली. उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी यांनी देशभक्त चित्रशाळा प्रेसचे ‘वासू काका जोशी’ हे पुस्तक संकलित-संपादित करून प्रकाशित केले आहे.

वासू काका जोशी यांचा जन्म 28 एप्रिल 1854 मध्ये झाला आणि निधन 12 जानेवारी 1944 रोजी झाले. एवढय़ा प्रदीर्घ कालखंडात या माणसाने विविध प्रकारची कामगिरी केली ती पाहून थक्क व्हायला होते. त्र्यं. र. देवगिरीकर यांनी वासू काकांचे बृहतचरित्र लिहून त्यांच्या या कारकीर्दीची दखल घेतलेली आहे. पण आता हे चरित्र अतिदुर्मीळ झाले असून जवळ जवळ विस्मृतीत गेल्यासारखे आहे. अशा परिस्थितीत सुवा जोशी यांना वासू काका जोशी यांचे चरित्र नव्याने नव्या पिढी पुढे यायला पाहिजे असे वाटत होते. याचे कारण हे वासू काका जोशी म्हणजे प्रकाशक सुवांचे वडील वामनराव जोशींचे सख्खे काका. वासू काका जोशींनी पुण्यात येऊन प्रकाशक म्हणूनही नाव मिळवले आहे. त्याप्रमाणेच सुवा जोशी यांनीदेखील त्याच पुण्यात प्रकाशक म्हणून स्वतची नाममुद्रा उमटवली.

हा नातू-आजोबांचा ऋणानुबंध आणि वारसा त्यांना सांगावासा वाटत होता. त्यासाठी देवगिरीकरकृत चरित्र संक्षिप्तपणे द्यायचा त्यांचा विचार होता. दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी वासू काका जोशी यांच्या कामगिरीवर लिहिलेला लेख सुवांच्या वाचनात आला. त्याच्या आगेमागेच डॉक्टर अरुणा ढेरे, राजेंद्र ठाकूर देसाई यांच्यासारख्या अभ्यासकांचे लेख आणि सदानंद मोरे, शरद गोगटे, रा. प्र. कानिटकर अशा पूर्वासुरींचे लेख संपादित करून सुवा जोशींनी वासू काकांच्या कार्य-कर्तृत्वाची ओळख करून दिलेली आहे. सदानंद मोरे यांनी वासू काकांची कामगिरी सांगताना म्हटले आहे, ‘टिळकांपेक्षा वयाने थोडे मोठे असलेल्या काकांनी अगोदर विष्णुशास्त्राr चिपळूणकरांकडे उमेदवारी केली, त्यानंतर ते टिळकांचे सहकारी म्हणून वावरले व टिळकांच्या पश्चात त्यांनी गांधीजींचे राजकारण स्वीकारले.’ मात्र ह. मो. घोडके यांनी आपल्या ‘महाराष्ट्र गाथा’मध्ये म्हटले आहे, ‘इ. स. 1857 उठावापासून ते इ. स. 1942 च्या चले जाव चळवळीपर्यंतची महाराष्ट्राची वाटचाल काकांनी अभ्यासली, पाहिली व थोडय़ाशा प्रमाणात स्वत अनुभवली. हा काळ फारसा सुखकारक नव्हता. त्या काळाच्या वेदना व त्याची दाहकता त्यांनी वेळोवेळी सोसली, पण देशभक्तीचा मार्ग त्यांनी सोडला नाही. पुण्याच्या महर्षी पटवर्धनांप्रमाणे त्यांचे कार्य लोकांना अज्ञात राहिले.’

महर्षी पटवर्धनांनीही बडोदा, हैदराबाद संस्थानिकांच्या मदतीने परकीय जोखडातून सुटका करून घेण्याची जंगी योजना आखली होती. महाराष्ट्राला जसे पटवर्धन माहीत नाहीत तसे वासू काका जोशीही फारसे माहीत नाहीत. हे त्या दोन नेत्यांचे दुर्दैव की, मराठीजनांचे ते दुर्दैव? एक गोष्ट मात्र खरी की, स्वातंत्र्य आंदोलनातील नेहमीची चौकट भेदून या दोन नेत्यांनी स्वातंत्र्याचा आगळा मार्ग चोखाळला, पण त्यांना नशिबाने साथ दिली नाही. अरुणा ढेरे म्हणतात, ‘आज चित्रशाळेची सदाशिव पेठेतील इमारत पुण्यात उरलेली नाही. काकांची म्हणावी तशी आठवणही उरलेली नाही. पूर्वीसारखी घराघरातून चित्रशाळेत छापलेल्या देवादिकांच्या तसबिरी लावणारी माणसे उरलेली नाहीत. उरले आहेत ते ‘चित्रमय जगतचे’ एखाद्या खासगी संग्रहातले सचित्र सुंदर अंक आणि देखण्या चित्रांचे अल्बम.’

वासू काकांची एक विलक्षण हकिगत नरेंद्र चपळगावकर यांनी सांगितलेली आहे. ते सांगतात, ‘व्यक्तिगत आयुष्यातील संकटांना वासू काकांनी धैर्याने तोंड दिले. त्यांच्या पत्नी वारल्या तेव्हा ते प्रेताजवळ बसण्याऐवजी चित्रशाळेत काम करीत उभे राहिले. अंतयात्रा ओंकारेश्वरला पोहोचल्यावर काका तेथे गेले आणि त्यांनी पत्नीच्या शवाला अग्नी दिला.’ महात्मा गांधींकडून काकांच्या सांत्वनार्थ जेव्हा पत्र आले, तेव्हा काकांनी जे उत्तर पाठवले ते ‘हरिजन’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘इतरांप्रमाणे मलाही भावना आहेत, पण विचारांचा लगाम मी भावनेला घातला आणि विकारांचा आवेग रोखू शकलो. वेदांतांच्या पठणापेक्षा वेदांताची शिकवण आपण आत्मसात किती केली याची परीक्षाच आपत्तीच्या प्रसंगी होत असते.’ अशा अनेक चित्तवेधक हकिगती या संकलित चरित्रग्रंथात वाचायला मिळतात. त्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.