अक्कलकोटमधील बसस्थानकाचा मार्ग खडतर, येण्याचा अन् जाण्याचा मार्ग एकच

क्कलकोटमध्ये नव्या बसस्थानकाचे काम चालू असल्याने शेडमध्ये तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. या बसस्थानकात बसचा प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग एकच असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. यामध्ये भरीस भर म्हणून बसस्थानकाला ऑटो रिक्षा व अवैध प्रवासी वाहनांचा गराडा पडला आहे. यामुळे प्रवासी आणि भाविकांसाठी या बसस्थानकाचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येत आहे.

अक्कलकोट बसस्थानकात आगार व्यवस्थापकांचे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अवैध प्रवाशी वाहनाच्या ऑटो रिक्षावाल्यांचा बसस्थानकाला गराडा घातल्याच्या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याबद्दल प्रवाशी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांना बसस्थानकात सुरक्षित प्रवेश मार्ग करण्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात; अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उपाययोजना कराव्या लागतील, असा इशारा तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे, जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी दिला आहे.

अक्कलकोट बसस्थानकातून एसटी बस बाहेर काढणे व आत प्रवेश करणे बसचालकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला ऑटो रिक्षा थांबत आहेत. बाहेरच्या बाजूने अवैध प्रवासी वाहन रांगेत उभी राहतात. ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येत नाही काय, असा सवाल प्रवासी करत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा, अवैध प्रवाशी वाहने थांबल्याने परिसरात वाहनांची कोंडी होत असल्याच्या बाबीकडे वाहतूक पोलीस जाणूनबुजून डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

बसथांबा परिसरात अतिक्रमणही नव्याने बस्तान मांडत आहे. नगरपालिकेची अतिक्रमण मोहीमही लॅण्ड माफिया बिल्डर यांच्या दबावापुढे नतमस्तक होत आहे. शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारी अनेक ठिकाणी वाहने वळण घेताना अडथळा ठरणारी अतिक्रमणे त्वरित काढणे गरजेचे आहे. मल्लिकार्जुन यात्रा रथोत्सव जवळ आल्याने बसस्थानक अतिक्रमणमुक्त करणे गरजेचे आहे.