सामना अग्रलेख – हुकूमशाहीचा पराभव होईल!

evm-f

पंतप्रधान मोदी यांनी काल ‘ईडी’ वगैरे तपास यंत्रणांचे पुन्हा कौतुक केले. याच तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदींनी भाजपच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केले. मोदी यांचा पंतप्रधानपदाचा काळ हा अन्याय व भ्रष्टाचाराचा काळ ठरला. मोदी यांच्या काळात आर्थिक गुन्हेगारांना मोकाट रान मिळाले. कारण हे सर्व गुन्हेगार भारतीय जनता पक्षाला हजारो कोटींच्या खंडण्या देत होते. देशाची लूट करण्याचा मुक्त परवाना या खंडणीखोरांना देण्यात आला व लुटीचा वाटा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचला. हे सर्व सुप्रीम कोर्टाने उघड केले. मोदी सरकारची पुरती फजिती झाली. उरलेले वस्त्रहरण 4 जूनला होईल. त्या दिवशी देशातील हुकूमशाहीचा पराभव झालेला असेल!

हिंदुस्थानात लोकशाहीचे संपूर्ण धिंडवडे गेल्या दहा वर्षांत निघाले. तरीही ‘जगातील सगळय़ात मोठी लोकशाही’ असे ढोल वाजवले जातात. आता या देशात लोकशाही राहणार की मोदी-शहाकृत हुकूमशाहीची सुरुवात होणार? हे देशाच्या जनतेलाच ठरवायचे आहे. लोकसभेच्या रणसंग्रामाची घोषणा झाली आहे. 19 एप्रिल ते 1 जून अशा सात टप्प्यांत देशात निवडणुका होतील. पंडित नेहरूंपासून नरसिंह राव, मनमोहन सिंगांपर्यंत दोन-चार टप्प्यांत निवडणुका होत होत्या. आता ‘चांद्रयान’ पाठवणाऱ्या देशाला सात टप्प्यांत निवडणुका घ्याव्या लागत आहेत. 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांत झाली होती. मात्र त्यानंतर जग झपाटय़ाने बदलले आहे. भारतातदेखील विज्ञान, तंत्रज्ञानाने झेप घेतली, ‘डिजिटल इंडिया’चे श्रेय तर पंतप्रधान मोदी घेतच आहेत. मग संपूर्ण देशात एकाच दिवशी निवडणुका घेण्याची क्षमता आमच्या निवडणूक आयोगात का असू नये? निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले. भाजपला सोयीचे ठरेल असे हे वेळापत्रक प्रथमदर्शनी दिसते. हुकूमशाही असलेल्या देशातही निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. रशियातही राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान सुरू आहे. पुतीन यांना पुन्हा सिंहासनावर बसवण्यासाठीच तेथे निवडणुकांचा फार्स चालला आहे. पुतीन यांच्या रशियातही लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्कांची पायमल्लीच सुरू आहे. भारतात तरी काय वेगळे चालले आहे! या वेळी आम्ही ‘चारशे’ जिंकणार हा अहंकार याच हेराफेरीतून येतो. हुकूमशहा लोकशाहीचे चिलखत घालून राज्य करू लागले आहेत. सरकारी खर्चाने, सरकारी यंत्रणेचा पूर्ण

गैरवापर करून

मोदी हे भाजपचा प्रचार करीत आहेत. हेच हुकूमशाहीचे मुख्य लक्षण आहे. देशाच्या उद्योगपती, ठेकेदारांकडून तिजोरीत सहा हजार कोटी निवडणूक निधी जमा केला व विरोधकांना मदत करणाऱया उद्योगपतींवर धाडी टाकल्या. यालाच हुकूमशाही म्हणायला हवी. पुन्हा देशाचे निवडणूक आयुक्त वेळापत्रक जाहीर करताना शहाजोगपणे सांगतात, निवडणूक काळात मनी लॉण्डरिंगविरुद्ध कडक उपाय केले जातील. अशा कडक उपाययोजनांत भाजपचे धनदांडगे उमेदवार व मोदी भक्तांचा समावेश राहील काय? सहा हजार कोटींचे इलेक्टोरल बॉण्डस् ही भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरूपाच्या पैशांची गंगोत्री आहे. भाजपच्या खात्यात ती गेली. निवडणूक आयोगाने त्यावर काय कारवाई केली? शेपूट घातलेला आपला निवडणूक आयोग मनी लॉण्डरिंगविरुद्ध कडक उपाय करण्याची भाषा करतो तेव्हा आश्चर्य वाटते. निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाने धनशक्ती, गुंडगिरी, अफवा पसरवणे, आचारसंहितेचे उल्लंघन अशा चार गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, पण हे चारही गुन्हे करणारे लोक भाजपचेच आहेत. पोलिसांचा वापर करून भाजप निवडणूक यंत्रणा ताब्यात घेईल. गुंड व पैसे त्यांच्याकडे आहेतच. त्यामुळे निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षावरच कडक नजर ठेवायला हवी. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो, पण मागच्या दहा वर्षांत तो पैसा व झुंडशाहीचा विकृत उत्सव झाला आहे. संपूर्ण देशात निवडणुका होत असताना जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका होणार नाहीत. मग कश्मीरातून

370 कलम हटवून

काय मिळवले? कश्मीरला देशाच्या निवडणूक प्रक्रियेतून वगळणे हे धोकादायक राजकारण आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती नाही, महाराष्ट्रात शांतता आहे. तरीही निवडणुका घेण्यास पाच टप्पे लागतात हे रहस्य आहे. संपूर्ण देशात निवडणूक प्रक्रिया 45 दिवस चालणार आहे. प्रगती व विकासाचे हे लक्षण नाही. भारतीय जनता पक्ष हा सदैव निवडणूक प्रचारात गुंतलेला पक्ष आहे. पंतप्रधान मोदी हे निवडून आल्यावर पुढची पाच वर्षे भाजप व स्वतःचा प्रचार करीत असतात. मोदी यांचा हा आत्ममग्नपणा हीच हुकूमशाही आहे. सत्य व स्पष्ट बोलणाऱ्यांची मुंडकी उडवायची हेच मोदी सरकारचे धोरण आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल ‘ईडी’ वगैरे तपास यंत्रणांचे पुन्हा कौतुक केले. याच तपास यंत्रणांच्या माध्यमातून मोदींनी भाजपच्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केले. त्यामुळे मोदी त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे कौतुक करणारच! या नाझी फौजांच्या बळावरच मोदी उद्याच्या निवडणुका जिंकण्याची भाषा करत असतील तर ते जगातल्या लोकशाहीचे दुर्दैव ठरेल! मोदी यांचा पंतप्रधानपदाचा काळ हा अन्याय व भ्रष्टाचाराचा काळ ठरला. मोदी यांच्या काळात आर्थिक गुन्हेगारांना मोकाट रान मिळाले. कारण हे सर्व गुन्हेगार भारतीय जनता पक्षाला हजारो कोटींच्या खंडण्या देत होते. देशाची लूट करण्याचा मुक्त परवाना या खंडणीखोरांना देण्यात आला व लुटीचा वाटा सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचला. हे सर्व सुप्रीम कोर्टाने उघड केले. मोदी सरकारची पुरती फजिती झाली. उरलेले वस्त्रहरण 4 जूनला होईल. त्या दिवशी देशातील हुकूमशाहीचा पराभव झालेला असेल!