सामना अग्रलेख – हरयाणातील पेटवापेटवी

श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर हिंदूंनी मंदिरांमध्ये जलाभिषेक जरूर करावा. त्याबद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही. किंबहुना कालपर्यंत हे सगळे होतच आले आहे. मात्र शांततेत होणारा हा विधी आज अचानक जातीयधार्मिक सलोखा नष्ट करणारा, धार्मिक हिंसेला निमित्त का ठरत आहे? कारण त्या माध्यमातून हिंदू आणि इतर धर्मीयांच्या भावना भडकवायच्या आणि त्या आगीवर आपल्या राजकीय पोळय़ा भाजून घ्यायच्या अशी कारस्थाने सुरू आहेत. जेमतेम चार आठवडय़ांपूर्वीच ज्या शोभायात्रेने हरयाणातील नूंहमध्ये धार्मिक हिंसेचा वणवा पेटवला होता ती शोभायात्रा पुन्हा त्याच ठिकाणी काढण्याचा हेकेखोरपणा याच उद्योगाचा भाग आहे. हिंदुत्वाच्या नावावर निरपराध्यांचे रक्त सांडले जात आहे. खऱ्या हिंदुत्वाला बदनाम करणारी हरयाणामधील पेटवापेटवी त्यासाठीच सुरू आहे.

मणिपूरसारखे देशाच्या सीमेवरील संवेदनशील राज्य जातीय हिंसाचारात ज्यांनी तीन-चार महिने जळू दिले ते आता राजधानी दिल्ली आणि पंजाबच्या सीमेवरील हरयाणा या राज्यातही धार्मिक हिंसेची चूड लावण्याच्या प्रयत्नात आहेत. हरयाणामधील नूंह जिल्हा या महिन्याच्या सुरुवातीला ज्या ‘ब्रिजमंडल शोभायात्रे’मुळे जातीय वणव्यात होरपळून निघाला होता, त्याच नूंहमध्ये पुन्हा धार्मिक तणावाची ठिणगी टाकण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेतर्फे पुन्हा एकदा तेथे ‘ब्रिजमंडल शोभायात्रा’ काढण्याची घोषणा झाली आणि नूंह जिल्हय़ाला लष्करी छावणीचे स्वरूप आले. राज्यातील भाजप सरकारने म्हणे या शोभायात्रेला परवानगी दिली नाही, परंतु तरीही शोभायात्रेचे आयोजक त्यांच्या निर्णयावर ठाम होते. नूंह येथे जलाभिषेक करणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. 31 जुलै रोजी याच कारणामुळे नूंह जिल्हय़ासह गुरुग्राम, सोहनी आणि फरिदाबाद जिल्हय़ात धार्मिक हिंसेचा वणवा पसरला होता. त्यात सात-आठ निरपराध लोकांना

प्राण गमवावे

लागले होते. शेकडो लोक जखमी झाले होते. मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले होते. इंटरनेट सेवा आणि शाळा-महाविद्यालये काही दिवस बंद ठेवण्याची नामुष्की हरयाणातील भाजप सरकारवर आली होती. 10 ते 15 दिवस संचारबंदी, जमावबंदी केल्यावर नूंहमध्ये परिस्थिती जेमतेम पूर्वपदावर आली होती. मात्र ही अपूर्ण राहिलेली ब्रिजमंडल शोभायात्रा 28 ऑगस्ट रोजी पूर्ण करणारच अशी घोषणा केली गेली आणि पुन्हा जातीय तणाव निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला. त्यावर हरयाणातील भाजप सरकारने यात्रेला परवानगी नाकारल्याची मखलाशी केली, पण ते एक नाटकच होते. कारण ‘शोभायात्रेला परवानगी दिलेली नाही, मात्र यात्रेत सहभागी होण्याऐवजी लोक आपापल्या भागातील मंदिरांमध्ये जलाभिषेकासाठी जाऊ शकतात,’ असे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले. पुन्हा नलहड येथील मंदिरात जलाभिषेक करायला हरयाणा पोलिसांनीच परवानगी दिली. ही बनवाबनवी नाही तर काय आहे? श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर हिंदूंनी मंदिरांमध्ये

जलाभिषेक

जरूर करावा. त्याबद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही. किंबहुना कालपर्यंत हे सगळे होतच आले आहे. मात्र शांततेत होणारा हा विधी आज अचानक जातीय-धार्मिक सलोखा नष्ट करणारा, धार्मिक हिंसेला निमित्त का ठरत आहे? कारण त्या माध्यमातून हिंदू आणि इतर धर्मीयांच्या भावना भडकवायच्या, त्या दंग्यांमध्ये निरपराध्यांच्या रक्ताचे ‘अभिषेक’ होऊ द्यायचे आणि त्या आगीवर आपल्या राजकीय पोळय़ा भाजून घ्यायच्या अशी कारस्थाने सुरू आहेत. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि हरयाणासह काही राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून भाजपवाले ठिकठिकाणी धार्मिक हिंसेच्या ठिणग्या टाकण्याचे उद्योग करीत आहेत. जेमतेम चार आठवडय़ांपूर्वीच ज्या शोभायात्रेने हरयाणातील नूंहमध्ये धार्मिक हिंसेचा वणवा पेटवला होता ती शोभायात्रा पुन्हा त्याच ठिकाणी काढण्याचा हेकेखोरपणा याच उद्योगाचा भाग आहे. पुन्हा हे सर्व हिंदुत्वाच्या नावाने सुरू आहे. हे खरे हिंदुत्व नसून सत्तापक्षाचे बेगडी हिंदुत्व आहे. राजकीय स्वार्थासाठी त्याचा आधार घेतला जात आहे. हिंदुत्वाच्या नावावर निरपराध्यांचे रक्त सांडले जात आहे. खऱ्या हिंदुत्वाला बदनाम करणारी हरयाणामधील पेटवापेटवी त्यासाठीच सुरू आहे.