सामना अग्रलेख – ‘इंडिया’ जिंकेल!

हुकूमशहा हा माथेफिरूच असतो. त्याने घेतलेल्या निर्णयांत सुसंगती नसते. सिंहासन हलवले जात आहे या भयाने तो अधिक बेफामपणे वागतो व निर्णय घेतो. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागला आहे. हुकूमशहा देशाचे आराध्य दैवत श्री गणेशालाही मानायला तयार नाही. श्री गणेशाच्या कृपेने शुभारंभ होत असताना त्यांनी श्री गणेशाच्या आगमनप्रसंगीच हुकूमशाहीचे शिंग फुंकले. ‘इंडिया’ आघाडीचे युद्ध त्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे. सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापि संपलेले नाही!

चार गाढव एकत्र चरत असले तरी हुकूमशहाला दरदरून घाम फुटतो. त्याला वाटते की ते आपल्याविरुद्ध कारस्थाने करून सत्ता उलथवीत आहेत. इकडे मुंबईत तर देशाच्या राजकारणातील 28 प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते दोन दिवस एकत्र जमले व त्यांनी देशातील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच. मुंबईत इंडिया गटाच्या बैठकीने देशात कोणता संदेश गेला? तर एकच संदेश तो म्हणजे, ‘राजा घाबरला व सिंहासन टिकविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाईल.’ विरोधक देशात अराजक माजवू इच्छित आहेत या सबबीखाली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. आता आपल्या राजकीय विरोधकांना घाबरलेले पंतप्रधान मोदी कोणती लोकशाहीविरोधी पावले उचलतात ते पाहू. इकडे इंडियाची बैठक सुरू असताना संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करून खळबळ माजवायचा प्रयत्न मोदी सरकारने केला; पण खळबळ काय, साधा बुडबुडाही फुटला नाही. ऐन गणेशोत्सवात असे विशेष अधिवेशन बोलावून मोदी काय साध्य करीत आहेत? महाराष्ट्रावर त्यांचा दात आहेच व ते गणपतीचे आगमनही निर्विघ्न पार पाडू देत नाहीत. ऐन गणपतीत महाराष्ट्राच्या खासदारांनी दिल्लीत येऊन मोदींची प्रवचने ऐकायची? बरे, ते प्रवचने झोडायला संसदेतही येत नाहीत. आता लोकांना गणेशोत्सवही ते साजरा करू देणार नाहीत. ही एक विकृतीच आहे. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास उत्तेजन दिले ते लोकांत जागृती निर्माण व्हावी म्हणून. महिनाभर आधी पुण्यात येऊन टिळक पुरस्कार स्वीकारणाऱया पंतप्रधान मोदींना याचा विसर पडला व महाराष्ट्रातील

गणेशोत्सवाच्या धामधुमीत

त्यांनी संसदेचे विशेष सत्र बोलावून महाराष्ट्राच्या सार्वजनिक भावनांचा अपमान केला व इंडिया आघाडीसही अपशकून करण्याचा प्रयत्न केला. ‘इंडिया’ आघाडीतील 28 राजकीय पक्षांमुळे देशातील हुकूमशाही प्रवृत्तीपुढे आव्हान उभे केलेच आहे. तसे नसते तर असे माथेफिरूपणाचे निर्णय मोदींनी घेतले नसते. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी यजमानपद भूषवलेल्या या बैठकीने अनेक जळमटे दूर केली. एक दिशा स्पष्ट झाली. आपण एकत्र आलो नाही तर हुकूमशहा आपल्याला गिळून टाकील. आधी देश वाचवायला हवा ही भावना राष्ट्रभक्त पक्षांत निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात एक वर्ग असा होता की, त्यांना ‘ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे. या देशातील बजबजपुरी नष्ट होऊन येथे कायद्याचे, सामाजिक सुधारणेचे राज्य निर्माण होईल. स्वातंत्र्य काय नंतरही मिळवता येईल,’ असे वाटायचे. स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा? असा वादही तेव्हा आपल्या पुढाऱ्यांत झाला होता. मोदी काळात तर स्वातंत्र्य उरलेले नाहीच, परंतु सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातही आपली पीछेहाट होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींची धार्मिक लोटांगणे वगैरे सगळे ढोंग आहे. देश पुन्हा धर्माच्या गुंगीत अडकवून तरुण पोरांना दंगेखोर बनवायचे व देशाची सर्व संपत्ती आपल्या दोस्त मंडळींना लुटण्याची मुभा द्यायची, हे आजचे चित्र आहे. त्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी उभी ठाकली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी, काँग्रेस व डाव्यांत मतभेद आहेत, पण ते चर्चा करण्यासाठी टेबलावर एकत्र आले. केरळातही तेच. दिल्ली, पंजाबात ‘आप’ने काँग्रेसशी चर्चा करण्याची तयारी दाखवली. महाराष्ट्रात

कोणतेही विशेष मतभेद

नाहीत. जम्मू-कश्मीरात डॉ. फारुख अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती एकत्र आहेत. असे सर्व धागे जुळून एक अतूट वस्त्र्ा निर्माण होत आहे, मात्र देशाला कार्यक्रम दिला नाही तर हे वस्त्र निरर्थक ठरेल. देशातील प्रश्नांवर रान उठवावे लागेल, जागावाटपाचा तिढा राज्याराज्यांत शांतपणे सोडवावा लागेल. एक राष्ट्रीय कार्यक्रम ठरवून जनतेसमोर जावे लागेल. आता बैठका नकोत, तर लोक आंदोलनाच्या जाहीर सभा राज्याराज्यांत घ्यायला हव्यात. हुकूमशाहीला थेट भिडायचे व 28 पक्षांच्या इंडिया आघाडीत मुक्त संवाद ठेवायचा हे सूत्र आता ठरले आहे ते महत्त्वाचे आहे. देशात भ्रष्टाचाराचा डोंगर उभा आहे. या डोंगराच्या पायथ्याशी मोदींचे सरकार व शिखरावर मोदींचे मित्रमंडळ आहे. केंद्राच्या ‘कॅग’ अहवालात ते स्पष्ट झाले. हुकूमशहा हा माथेफिरूच असतो. त्याने घेतलेल्या निर्णयांत सुसंगती नसते. सिंहासन हलवले जात आहे या भयाने तो अधिक बेफामपणे वागतो व निर्णय घेतो. भारत देशात आता तशा बेफामपणाचा अनुभव येऊ लागला आहे. हुकूमशहा देशाचे आराध्य दैवत श्री गणेशालाही मानायला तयार नाही. श्री गणेशाच्या कृपेने शुभारंभ होत असताना त्यांनी श्री गणेशाच्या आगमनप्रसंगीच हुकूमशाहीचे शिंग फुंकले. ‘इंडिया’ आघाडीचे युद्ध त्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे. सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापि संपलेले नाही!