थोडक्यात आणि सुटसुटीत! बातम्या जगभरातून…

रेल्वेचे दिल्ली ते नेपाळ सर्वात स्वस्त पॅकेज

हिंदुस्थानी रेल्वेने म्हणजेच आयआरसीटीसीने पर्यटकांसाठी अत्यंत स्वस्त दरात देशी आणि विदेशी टूरचे नियोजन केले आहे. यंदा रेल्वेने दिल्ली ते नेपाळ टूर पॅकेज सादर केले आहे. ज्यामध्ये पर्यटक काठमांडू आणि पोखराला भेट देऊ शकतात. या टूर पॅकेजच्या माध्यमातून नेपाळमध्ये जाऊन पर्यटकांना तेथील विविध ठिकाणांना भेटी देता येणार आहेत. या टूर पॅकेजचा प्रवास विमानाने असेल. नेपाळच्या टूरमध्ये एकूण 30 जागा आहेत. हे टूर पॅकेज 15 जूनपासून सुरू होणार असून दुसरे पॅकेज 23 मे पासून सुरू होणार आहे.
बेस्ट ऑफ नेपाळ एक्स दिल्ली
प्रति व्यक्ती 45 हजार
500 रुपये भाडे.
दोन व्यक्तींसाठी
प्रति व्यक्ती 37 हजार रुपये.
तीन लोकांसाठी
प्रति व्यक्ती 36 हजार 500 रुपये.
2 ते 11 वयोगटातील मुलांचे भाडे 25 हजार 600 रुपये.

फुकटय़ांची घुसखोरी; एसी कोचची ऐशीतैशी
रचित जैन नावाच्या व्यक्तीने ट्विट करून थ्री टायर एसी कोचचा भयंकर अवस्थेचा पह्टो टॅग केला. रचित जैनच्या बहिणीला ट्रेनमध्ये शिरताना फार वाईट अनुभव आला. गेटवर जास्त गर्दी होती. लोकांनी त्याच्या बहिणीला आत चढू दिले नाही. या गडबडीत बहिणीचा मुलगा प्लॅटफॉर्मवरच राहिला. मुलाला आत घेण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उतरण्याशिवाय बहिणीकडे दुसरा पर्याय नव्हता. धावत्या ट्रेनमधून उतरल्याने त्याच्या बहिणीला मार लागला. अशा घटना रोखा, अशी विनंती रचित यांनी केली आहे.]़

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक जण आपले अनुभव शेअर करत आहेत. ट्रेनचे एसी कोच म्हणजे जनरल कोच झालेत, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे. मागील पाच वर्षांत हिंदुस्थानी रेल्वे रसातळाला गेलेय, असेही नेटकरी म्हणत आहेत.

भिक्षुक होण्यासाठी दान केली 200 कोटींची संपत्ती
गुजरातमधील एका व्यावसायिक दांपत्याने भिक्षुक होण्यासाठी तब्बल 200 कोटींची संपत्ती दान केली आहे. जैन धर्मातील आध्यात्मिक मार्ग स्वीकारून भावेश भंडारी व त्यांच्या पत्नीने फेब्रुवारी महिन्यातच सर्व भौतिक सुखांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. भंडारी दांपत्याच्या दोन्ही मुलांनी 2022 मध्ये भिक्षुक होण्याचा निर्णय घेतला होता. आता मुलांच्या पावलावर पाऊल टाकत भंडारी दांपत्यानेही आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आहे. यापुढे ते देशभर अनवाणी फिरतील आणि या काळात केवळ भिक्षेवर जगतील. भिक्षुक झाल्यानंतर दांपत्याला केवळ दोन पांढरी वस्त्रs, भिक्षेसाठी एक वाटी आणि ‘राजारोहण’ बाळगता येईल.

अन् कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली…
कोकणातील अनेक समुद्र किनाऱयांवर कासवांच्या अनेक प्रजातींचे संवर्धन केले जाते. त्यांची अंडी आणि घरटी सुरक्षित ठेवण्यात येतात. कोकणातील अशाच एका मिठमुंबरी समुद्र किनाऱयावरून ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवांची पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. रविवारी मिठमुंबरी समुद्र किनाऱयावरून एका घरटय़ातून 123 अंडय़ांपैकी 81 पिल्ले, तर दुसऱया घरटय़ातून 95 पैकी 37 पिल्ले सुखरूप समुद्रात सोडण्यात आली. दोन्ही घरटय़ांतील मिळून सुमारे 118 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

जेनेसाईड जो, जेनेसाईड जो…
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अमेरिकेतूनही त्यांना विरोध होत असून पेनन्सिल्वेनियामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू असताना जेनेसाईड जो म्हणजेच बायडेन यांना संपवून टाका, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी होताच ट्रम्प यांनी पॉझ घेतला आणि हे काही चुकीचे नाही, बायडेन यांनी जे काही केले ते चुकीचेच आहे, असे म्हटले.

पाण्यातील अतिसूक्ष्म प्लास्टिक वेगळे काढणारे हायड्रोजेल!
समुद्रापासून पर्वतरांगांपर्यंत या पृथ्वीतलावर सगळीकडे अतिसूक्ष्म म्हणजेच मायक्रो प्लास्टिक सापडते. हे साध्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे पाण्यावाटे तसेच हवेतून ते शरीरात जाते आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पण आता हे अतिसूक्ष्म प्लास्टिक वेगळे काढता येईल. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या वैज्ञानिकांनी अतिसूक्ष्म प्लास्टिक वेगळे काढणारे टिकाऊ हायड्रोजेल तयार केले आहे.