संजय राऊत यांच्याविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा मागे; घोडचूक झाल्याचे पोलिसांनी केले मान्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करताना घोडचूक झाल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यांना हे कलम लावण्यास प्रतिबंध केला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करताना चूक झाल्याचे मान्य करत संजय राऊत यांच्याविरोधातील देहद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दैनिक सामनामध्ये रोखठोक या सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत लिखाण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशांचा दाखला देत संजय राऊत यांच्यावरील कलम 124 (अ) देशद्रोहचा गुन्हा दाख़ल केला होता तो मागे घेतला आहे. हा गुन्हा आता रद्द करण्यात आला आहे.

या प्रकरणी तक्रारदार नितीन सुरेशचंद्र भुतडा (वय 42, जिल्हा समन्वय भारतीय जनता पक्ष यवतमाळ, पुसद) यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात 11 डिसेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद केली होते की, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 10 डिसेंबर2023 रोजी सामना वृत्तपत्रामध्ये पान क्रमांक 03 वर रोखठोक या मथळ्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत लिखाण केले आहे. त्यात मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असता तर 2024 चे निवडणुकाआधी मोदींनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता आणि एखादे पुलवामा घडतांना उघड्‌या डोळ्यांनी पाहीले असते. काश्मिरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात आहे. देश खतरे में है च्या गर्जना करून देशभक्तीसाठी भाजपने मत मागितले असते. जवानांच्या शवपेट्‌यांना वंदन करणारी छायाचित्रे घेत आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणीही नाही असे भासविण्याचा प्रयत्न केला असता, असे छापण्यात आले होते. या लेखात दोन धर्मात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा व संविधानिक पदावर विराजमान असलेल्या पंतप्रधानावर बिनबुडाचे गंभीर आरोप करत देशाची प्रतिमा मलिन करत देशद्रोह केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 153 (0),505(2), 124 (अ) गुन्हा दाखल करून घेतला. त्यात 124 अ हे कलम देशद्राहाच्या गुन्ह्यासाठी लावण्यात आले होते.

या गुन्हयाच्या प्राथमिक तपासात सर्वोच्च न्यायालयाचे रिट पिटीशन क्रमांक 682/2021 एम.जी. बौबटकरे विरुद्ध भारत सरकारमध्ये पारित झालेल्या दिनांक 11/05/2022 आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाने कलम सादगी 124 (अ) बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार याना या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यास प्रतिबंध केल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त रिट पिटीशन क्रमांक 682/2021 अन्वये दिलेल्या निर्देशास अधिन राहुन या गुन्हयात लावण्यात आलेले भादवी कलम 124 (अ) हे गुन्हयातुन वगळण्यात आले आहे. गुन्हयाच्या प्राथमिक तपासात गुन्हयाचे घटनास्थळ हे सामना भवन दैनिक सामना मार्ग प्रभादेवी मुंबई 40025 असल्याने कलम 177 सी.आर.पी. सी. अन्वये या गुन्ह्याचा पुढील तपासासाठी गुन्हयाची मुळ कादगदपत्रे वरिष्ठांमार्फतीने दादर पश्चिम येथील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत.