शरद पवार यांच्या उपस्थितीत अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन, साताऱयात शशिकांत शिंदे यांचा आर्ज दाखल

आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने आज साताऱयात शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. रणरणत्या उन्हातही हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर अवतरल्याने सातारचा ‘राजकीय पारा’ही चांगलाच वाढल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या साक्षीने दाखल करण्यात आला. तत्पूर्वी सातारच्या ऐतिहासिक गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीद्वारे विराट शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रॅलीत शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, ऍड. उदयसिंह पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हणमंतराव चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

तुतारीचा नाद आणि ताशाच्या कडकडाटासह जल्लोषात निघालेल्या या रॅलीत ‘मी येतोय तुमचा आशीर्वाद घ्यायला; फक्त साथ तुमची हवी…’ या टॅगलाइनचे पोस्टर्स साताऱयात जागोजागी लक्ष वेधून घेत होते.

रॅलीचे खरे नायक शरद पवार!

आमदार शशिकांत शिंदे यांनी आज अर्ज दाखल करताना काढलेल्या रॅलीचे खरे नायक ठरले ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. पवार यांचे गांधी मैदानावर आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सातारा जिल्हा हा पवारांचा विचार मानणारा जिल्हा आहे. पवार जेथे सांगतात, तेथेच सातारकर मतदान करतात, हा आजवरच्या निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे पवारांनी दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी सातारकर स्वतःहून रस्त्यावर उतरले होते.