Lok Sabha Election 2024 – हुकूमशाहीविरुद्ध मशाल पेटली, शिवसेनेचे 17 शिलेदार रणांगणात

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. देशातील हुकूमशाही नेस्तनाबूत करण्यासाठी, गद्दारांना गाडण्यासाठी आणि लोकशाहीचा विजय निश्चित करण्यासाठी शिवसेनेने 17 तडफदार शिलेदार रणांगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीला विजयश्री मिळवून देण्यासाठी हे शिलेदार शिवसेनेची धगधगती मशाल हाती घेऊन सत्ताधारी महायुतीची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शिवसेनेचे उमेदवार कधी जाहीर होणार याबद्दल महाराष्ट्रासह देशभरात उत्सुकता होती. आज राज्यभरातील 17 मतदारसंघांमधील उमेदवार शिवसेनेने जाहीर केले. यात प्रामुख्याने मुंबईतील चार मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना नेते व विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना सलग तिसऱयांदा उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांना शिवसेनेने पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. ईशान्य मुंबईतून माजी खासदार संजय दिना पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे, तर वायव्य मुंबईतून तरुण, तडफदार व निष्ठावंत शिवसैनिक अमोल कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे.

हुकूमशाहीचा पराभव करू शकतील असे सक्षम उमेदवार देण्यावर शिवसेनेने भर दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले शिवसेना नेते-खासदार राजन विचारे यांना शिवसेनेकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून शिवसेना नेते-खासदार विनायक राऊत, तर धाराशीवमधून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. रायगड मतदारसंघात शिवसेना नेते अनंत गिते, तर संभाजीनगरमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

प्रा. नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), संजोग वाघेरे-पाटील (मावळ), डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक) या उमेदवारांचा यादीत समावेश आहे.