दिल्ली ते मुंबई विदेशी मद्याची तस्करी, काळाबाजार तस्कराला पकडून लाखोंचा मद्यसाठा हस्तगत

महागड्या विदेशी मद्याची तस्करी करून त्या मद्याचा काळाबाजार करणाऱया एका मद्य तस्कराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-2 च्या पथकाने पकडले. त्या तस्कराच्या गाडी आणि घरातून विदेशी मद्याच्या तब्बल 205 बाटल्या हस्तगत करण्यात पथकाला यश मिळाले आहे.

दिल्लीतून आलेला विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीरपणे एका व्यक्तीकडे असल्याची माहिती भरारी पथक-2 ला मिळाली. ती व्यक्ती वरळी येथे येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक प्रकाश काळे, दुय्यम निरीक्षक प्रज्ञा राणे, लक्ष्मण लांघी, हिना फोपूलनकर तसेच विनोद अहिरे या पथकाने सतीश पटेल (35) या तरुणाला त्याच्या गाडीतून विदेशी मद्याची तस्करी करताना वरळी येथे रंगेहाथ पकडले. त्याच्या अंधेरी लोखंडवाला येथील घरात विदेशी मद्याच्या विविध कंपनीच्या तब्बल 14 लाख 39 हजार रुपये किमतीच्या बाटल्या सापडल्या. दरम्यान, सतीशकडे विदेशी मद्याचा साठा गुरगावहून दिल्ली आणि दिल्लीहून ट्रेनने मोहम्मद नावाची व्यक्तीमार्फत मुंबईत आला होता. भरारी पथक त्या मोहम्मदचा शोध घेत आहे.

बापानंतर मुलाकडून तस्करी

सतीशचा बाप शिवलाल हा आधी विदेशी मद्याची तस्करी करून त्याची मुंबईत विविध ठिकाणी विक्री करायचा. त्याच्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून सतीश विदेशी स्कॉचच्या मद्याची तस्करी करून त्याचा काळाबाजार करत होता. पण अखेर तो सापडला.