T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्याचा पत्ता होणार कट? निवड समिती घेणार मोठा निर्णय!

आयपीएलचा (IPL 2024) सतरावा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अद्याप तरी फायदेशीर ठरलेला नाही. रोहित शर्माच्या जागी मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची निवड चाहत्यांना काही आवडली नाही. त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. तसेच पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला 6 सामन्यांमधील फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. विशेष म्हणजे पंड्याला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये म्हणावी तशी कमाल करता आलेली नाही. त्याचा खेळ साधारण राहिलेला आहे.

आयपीएल 2024 संपल्यानंतर जून महिन्यामध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानची निवड समितीही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बैठकीमध्ये हार्दिकचा पत्ता कट होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ही बैठक मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि बीसीसीआयच्या इतर सदस्यांमध्ये पार पडली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये वेगवान गोलंदाजी आणि ऑलराउंडर्स यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. विशेष करून हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर निवड समिती बारकाईने लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलच्या पुढील सामन्यांमध्ये हार्दिकने चांगली गोलंदाजी केली तरच त्याची टी-20 विश्व चषकासाठी निवड होण्याची शक्यता आहे. अन्यथा त्याचा आगामी टी-20 विश्व चषकामधून पत्ता कट होऊ शकतो.