स्पोर्टिंग क्लब कमिटीने बाजी मारली

शताब्दी वर्ष साजरे करत असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने विरारच्या अमेय स्पोर्टस् अकॅडेमीचा आठ विकेटस्नी पराभव करत संदीप दहाड अॅकॅडेमी आयोजित 12 वर्षे वयोगटाच्या 15 षटकांच्या ठाणे ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱयांदा विजेतेपद मिळवले. निर्णायक लढतीत स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने अमेयचे 112 धावांचे आव्हान 13.5 षटकांत दोन विकेटस्च्या मोबदल्यात सहज पार करत अजिंक्यपद कायम राखले.

सेंट्रल मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत अमेय स्पोर्टस् अकॅडेमीने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात 112 धावा केल्या. सोहम पलईने 42 धावांची खेळी करत संघाच्या शतकी धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.काwशिक साळुंखेने दोन, अतुल चौधरी आणि अर्णव पांडेने प्रत्येकी एक गडी बाद केला. स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱया अनुज चौधरीने या सामन्यातही आपली छाप पाडताना नाबाद 68 धावा करत संघाला लागोपाठ दुसऱया वर्षी विजयी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. कर्णधार आरुष खंदारेने 20 धावा बनवल्या.

त्याआधी स्पोर्टिंग क्लब कमिटीने उपांत्य फेरीत माटुंगा जिमखान्याच्या 9 विकेटस्नी फडशा पाडला होता. अर्णव वाणीने 3 गडी बाद करत माटुंगा जिमखान्याला 15 षटकांंत 7 बाद 88 धावांवर रोखले होते. त्यानंतर अर्णव चौधरीने नाबाद 41 आणि आरुष खंदारेने 31 धावा बनवत 11.4 षटकांत 1 बाद 89 धावांसह संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते. स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या 12 वर्षांखालील संघाचे या मोसमातील हे दुसरे विजेतेपद आहे. शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित केलेल्या 12 वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत यजमान संघ विजयी ठरला होता.