सुंदर मी होणार; मॉडर्न गोव्याचा पारंपरिक लुक

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

ऐतिहासिक वारसा असलेले गोवा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेच तसेच ऐतिहासिक, सांस्कृतिक रूपांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. गोव्यातील कष्टकरी वर्गाची साडी म्हणजे कुणबी साडी. गोव्यातील या ऐतिहासिक वस्त्रपरंपरेविषयी आज जाणून घेऊया.

पोर्तुगीज येण्याअगोदर साधारण सोळाव्या शतकापासून कुणबी साडी ही गोव्याच्या कुणबी समाजातील स्त्रियांची एक ओळख बनली. कारण कुणबी साडी आणि तिचा लाल रंग हा गोव्यातील गावडा व कुणबी महिलांचा मुख्य पोशाख होता. लाल रंगाचे चेक्स असलेले ही साडी असे. तसेच ही साडी ढोपरापर्यंत नेसण्याची पद्धत होती. या साडीवर ब्लाऊज घातला जात नसे. मात्र हळूहळू बदल होत गेला. पूर्वी ही साडी फक्त लाल रंगातील वेगवेगळय़ा शेड्समध्ये रंगवली जायची. मात्र हळूहळू यात बदल होत गेला आणि मग निळा, काळा, राखाडी असे वेगवेगळे रंग या साडीमध्ये पाहायला मिळू लागले. यामध्ये लहान व मोठे चेक्स अशा प्रकारे हे हातमागावर विणले जातात. साधारण एक ते दीड इंचाच्या या चेक्सची डिझाइन या साडय़ांवर असते. मात्र अलीकडे या साडय़ांमध्ये वेगळेपण आणण्यासाठी थोडा कारागिरीमध्ये बदल केला गेला.

वस्त्रप्रावरणाच्या जगात या साडीला ग्लॅमरस स्थान प्राप्त करून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. अलीकडे ही साडी फॅशन प्लॅटफॉर्मवरही नेसली जाऊ लागली. फुग्यांच्या बायांचे ब्लाऊज घातले जाऊ लागले. वेगवेगळे फॅशनेबल ब्लाऊजदेखील या साडीवर घातले जाऊ लागले.

पूर्वी साडीवर काळय़ा रंगाच्या मोत्यांचे दागिने असायचे. हळूहळू यात फरक होत गेला आणि सिल्वर ज्वेलरी व लहान-मोठय़ा आकाराच्या रंगांच्या मोत्यांच्या माळाही घालतात. साडीवर लाल व हिरव्या रंगाच्या बांगडय़ा घालत असत व काळय़ा रंगाच्या मोत्यांनी गळय़ाची शोभा वाढवत असत. कुणबी साडीला धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे. ही साडी देवीला अर्पण केली जाते. साडीला गोव्याचे ऐतिहासिक वस्त्र म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मेकअप…जरा हटके
कुणबी साडी ही शेतकरी महिलांची असल्यामुळे यावर फार मेकअप केला जात नाही. पण या महिला जेव्हा एखादा कार्यक्रम सादर करतात तेव्हा मात्र त्या वेगवेगळय़ा प्रकारच्या टिकल्या कपाळावर लावतात. तसेच डोळय़ांत काजळ घालून कपाळावरील पुंकवाच्या बाजूला पांढऱया किंवा काळय़ा रंगाचे टिपके देऊन या टिकलीला आणखीन शोभा आणली जाते. अनेक वेळा या स्त्रिया मेकअपचा एक भाग म्हणून शरीरावर गोंदण करून घेत असत. कपाळावर, हनुवटीवर गोंदण केले जायचे व तोच त्यांचा मेकअप असायचा. तसेच केसांचा अंबाडा घालून त्यावर गजरा किंवा वेणी माळली जायची. जसजशी ही साडी फॅशनच्या प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली तसतसा या साडीवर मेकअपचा रंग चढू लागला आणि त्यामुळेच मग या साडीवर हलकासा फाऊंडेशनचा बेस लावून झाल्यावर डोळय़ांत भरपूर काजळ घालून आयलाइनर लावले जाते. आयब्रोच्या खाली आणि कानाच्या पाळीच्या मध्यावर कपाळाच्या कानपट्टीच्या जवळ गोंदण काढले जाते. तसेच हनुवटीवरदेखील गोंदण काढण्याची पद्धत अवलंबली जाते. आयब्रो थोडय़ा डार्क केल्या जातात. साडीवरील मेकअपचा बेस थोडा डार्क टोनमध्ये किंवा कॉपर टोनमध्ये ठेवला जातो.

[email protected]