दीर्घायु भव; अपेंडिक्सवर वेळीच करा उपाय

> वैद्य सत्यव्रत नानल

‘अपेंडिसायटिस’ म्हणजे सामान्यतः अपेंडिक्सला सूज येणे. सूज खूप वाढल्याने ताण सहन न होऊन अपेंडिक्स फुटणे. यांच्या कारणांविषयी आपण मागील लेखात जाणून घेतले. यावरील उपायांची माहिती आज घेऊया.

अपेंडिक्स म्हणजे छोटे आतडे मोठय़ा आतडय़ाला जिथे जोडलेले असते त्या मोठय़ा आतडय़ाच्या भागाला आयुर्वेदात ‘उंडुक’ म्हणतात. या भागाला एक छोटी शेपटीसदृश रचना असते. त्या शेपटीला आधुनिक वैद्यकाने ‘अपेंडिक्स’ असे नाव ठेवले आहे.

अपेंडिक्सचा त्रास होणे टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट  म्हणजे पोट साफ ठेवण्याची सवय करणे. पूर्वी घराघरांमध्ये शनिवार, रविवार पकडून लहानमोठय़ा सर्वांनी मिळून एरंडेल आणि कोरा चहा एकत्र पिण्याचा कार्यक्रम केला जायचा. आजही आणि यापुढेही हा उपाय करणे उत्तम आणि योग्यच आहे.   संग्रहणी, आतडय़ात जखमा (अल्सर) होणे, डायव्हर्टिक्यूलायटिस असे त्रास ज्यांना आहेत त्यांनी मात्र हा उपाय करू नये. लहान मुलांमध्ये मलावरोध आणि अपेंडिक्स दोन्ही त्रास जास्त होताना दिसतात. म्हणून मुलांमध्येसुद्धा पोट साफ होणे अत्यंत महत्त्वाचे असते.

  • आतडय़ाचे काम व्यवस्थित होण्यासाठी ग्रिसिंग/वंगण (सर्व्हिसिंग) अत्यावश्यक असते. यासाठी दूध, तूप, लोणी नियमित खाणे उत्तम ठरते. 
  • आहारातून काम पूर्ण होत नसेल तर पंचकर्मातील बस्ती प्रकार निरुह बस्ती आणि अनुवासन बस्ती हे गरजेप्रमाणे केले जाऊ शकतात. यासाठी आपल्याजवळील वैद्यांना संपर्क करावा. 
  • अभ्यंग : सर्वांगास  अभ्यंग (तेलाने मालिश) केल्याने छोटय़ा छोटय़ा तक्रारी लगेच बऱया होतात आणि होणे टाळलेही जाते.   
  • कृमिघ्न आहार, विहार : पोटात जंत झाले तर अपचन टिकते आणि अपेंडिक्सचा त्रासही मोडतो. त्यामुळे आहारातून नियमितपणे डाळिंब, गाजर, शेवगा शेंग, काळीमिरी, लसूण, कढीपत्ता, आले, जिरे यांचा वापर करणे सर्वात उत्तम आणि दर तीन ते सहा महिन्यांनी जंतांचे औषध आपल्या वैद्याकडून घेणेही गरजेचे. 
  • नाभि पुरण : नाभी म्हणजे बेंबीत रोज एक चमचा एरंडेल कोमट करून सोडणे आणि किमान पंधरा मिनिटे तसेच तिथे ठेवणे. याने पोटातील मळ, वायू बाहेर पडण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारून अन्न उत्तम पचते.
  • दिवसा झोप आणि रात्री जागरण याने अपचन होते. त्यामुळे टाळावे हे नक्की. व्यवसायामुळे जर हे होत असेल तर आपल्या वैद्याकडून याबद्दलचे नियम समजून घ्यावेत. 
  • मलावरोध : पोट साफ न होणे. याने पचनाच्या सर्वच क्रिया बिघडतात. त्यामुळे याकडे कायम लक्ष ठेवावे आणि आवश्यक औषध, आहारच करावा. 
  • आहारातील पथ्य : दुधी, पडवळ, दोडका, भेंडी, दूध, तूप, गोड फळांचे प्रकार आपल्या आहारात नियमित ठेवावेत.

    आयुर्वेदात अपेंडिक्ससाठी आत्ययीक चिकित्सा (इमर्जन्सी ट्रीटमेंट) आहे का? याचे उत्तर हो असे आहे. ज्यावेळी रोग्यास हा त्रास होतो त्यावेळी आपल्या वैद्याकडून सिरावेध रक्तमोक्षण करून घ्यावे. सिरावेध रक्तमोक्षण म्हणजे हाताच्या किंवा पायाच्या शिरेतून ब्लड डोनेट करतात त्याप्रमाणे फक्त 100 ते 150 मिली रक्त काढून फेकून देणे. याने अपेंडिक्स फुटणार असेल तर टाळता येते. ऑपरेशनची वेळही टाळता येऊ शकते, पण शक्य आहे का ते वैद्यच ठरवू शकतो. नाही तर रक्त काढल्याने किमान हॉस्पिटलपर्यंत पोहचेपर्यंतचा वेळ नक्की मिळतो. 

सोबत सहज जर पोटही साफ झाले तर अपेंडिक्सचे ऑक्टिव्ह फेजमध्ये असलेले रोगी क्रॉनिक फेजमध्ये येतात आणि ऑपरेशनची गरजही टळते. हे मी स्वतःही काही रुग्णांवर पूर्वी अनुभवलेही आहे. 

[email protected]