60 दिवसांत 427 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, मिंधे सरकार मात्र निवडणुकांमध्ये मशगूल

भीषण पाणीटंचाईमुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण राज्यकर्ते पक्ष पह्डापह्डीच्या राजकारणात आणि आता निवडणूक प्रचारात मशगूल आहेत. सरकारने दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यात मागील दोन महिन्यांत 427 शेतकऱयांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. गेल्या वर्षी दहा महिन्यांत तब्बल 2 हजार 366 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या होत्या.

यंदा अपुऱया पावसामुळे उत्पादकतेत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. राज्यात प्रतिकूल हवामानामुळे पेरण्या झाल्या नाहीत. विलंबाने आलेल्या पावसामुळे पेरण्या लांबल्या. दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले आहे. नापिकी, शेतमालाला न मिळणारा भाव, कर्जबाजारीपणा, मुलांचे शिक्षण आणि अन्य घरगुती कारणांमुळे त्रासलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

n राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सुरू झालेले शेतकऱयांच्या आत्महत्यांचे सत्र अजूनही थांबत नाही. राज्यात एकाही शेतकऱयाची आत्महत्या होऊ देणार नाही, अशी घोषणा राज्यात सत्तेत आल्यावर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती, पण मागील वर्षी केवळ दहा महिन्यांत 2 हजार 366 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

महसुली विभागानुसार शेतकऱयांच्या आत्महत्या

अमरावती 175
छत्रपती संभाजीनगर 146
नागपूर 54
नाशिक 48
पुणे 4
एकूण 427

अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक आत्महत्या

राज्यात अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या महसूली विभागांमध्ये सर्वाधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत अमरावती जिह्यात 48, तर विभागात 175 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही भीषण परिस्थिती आहे. विभागात दुष्काळाचे सावट आहे. पाणीटंचाई आणि रखरखत्या उन्हाने पिके उद्ध्वस्त झाली असून दोन महिन्यांत 146 शेतकऱयांनी मृत्यूला कवटाळले आहे.