निवडणूक आयोगाकडून 4650 कोटींची सामग्री जप्त; 2069 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले

लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकांनी विविध राज्यांतून 2069 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह 4650 कोटी रुपयांची सामग्री जप्त केली आहे.

1 मार्चपासून केलेल्या कारवाईतील ही सामग्री 2019 च्या संसदीय निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या 3475 कोटींपेक्षा जास्त आहे. 1 मार्चपासून आयोगाचे अधिकारी दररोज सुमारे 100 कोटी रुपयांच्या वस्तू, रोकड जप्त करत आहेत.

395 कोटींची रोकड जप्त

4,658 कोटी रुपयांच्या एकूण जप्त सामग्रीत रोख रक्कम 395 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर मद्यसाठा 489 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. विशेष म्हणजे जप्तीपैकी 45 टक्के सामग्री ही अमली पदार्थ (2069 कोटी रुपये) आहेत. गेल्या काही वर्षांत गुजरात, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांदरम्यान जप्तीची लक्षणीय कारवाई झाली आहे.

हेलिकॉप्टर तपासणी गैर नसल्याचा दावा

टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीत गैर काहीही नसल्याचे आयोगातील सूत्रांनी सांगितले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना विमानतळ आणि हेलिपॅडवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कुठलीही प्रलोभनपर सामग्री हवाई मार्गानेही जाऊ नये यासाठी असा तपास देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या हवाईतळांवर केला जात आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.