29 जवानांसह बेपत्ता झाले होते वायूदलाचे विमान, 7 वर्षानंतर बंगालच्या खाडीत सापडले अवशेष

जवळपास साडे सात वर्षांपूर्वी अचानक रडारवरून बेपत्ता झालेल्या हिंदुस्थानी वायूदलाच्या AN-32 या विमानाचे अवशेष बंगालच्या खाडीमध्ये सापडले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसन टेक्नॉलॉजीने (एनआयओटी) हा शोध लावला असून वायूदलाने एक पत्रक काढत याबाबत माहिती दिली आहे.

वायूदलाचे AN-32 हे विमान 22 जुलै 2016 रोजी एका मोहिमेवर जाताना रडारवरून बेपत्ता झाले होते. या विमानामध्ये वायूदलाचे 29 जवान होते. बंगालच्या उपसागरावरून जाताना हे विमान बेपत्ता झाले होते. यानंतर वायूदलाने नौदलाच्या मदतीने याचा शोध सुरू केला. जवळपास 28 जहाजं, पाणबुडीच्या माध्यमातून विमानाचा शोध सुरू होता. पण विमानाचा थांगपत्ता लागला नाही.

आता अखेर साडे सात वर्षानंतर या विमानाचे अवशेष चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापासून 300 किलोमीटर आत सापडले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसन टेक्नॉलॉजी (एनआयओटी) याचा शोध लावला आहे. यासाठी विमान बेपत्ता झाले त्या ठिकाणी समुद्रामध्ये ऑटोमॅटिक अंडरवॉटर व्हेईकल तैनात केले होते. या मदतीने बंगालच्या खाडीत साडे तीन किलोमीटर खोलीवर विमानाचे अवशेष आढळले.

ऑटोमॅटिक अंडरवॉटर व्हेईकलला समुद्रकिनारी सर्वात आधी पत्र्याचा तुकडा दिसला. यावर तीन रंगांचे चिन्ह होते. सुरुवातीला हे एखाद्या जहाजाचे अवशेष असावेत असे वाटले. या भागात आणखी काही धातुचे तुकडे आढळून आले. याचे फोटो नौदल आणि वायूदलाला पाठवण्यात आली. त्यानंतर हे बेपत्ता विमानाचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन यांनी दिली.