100 टक्के नालेसफाईच्या दाव्यानंतरही 777 तक्रारी; चॅटबॉट क्रमांकावर तक्रारींचा पाऊस

मुंबई महानगरपालिकेने 31 मेच्या डेडलाइनआधी आठवडाभर नालेसफाई पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी नालेसफाईबाबत गेल्या 40 दिवसांत तब्बल 777 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नालेसफाईबाबतच्या तक्रारी करण्यासाठी पालिकेने 1 जूनपासून 9324500600 हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी आलेल्या तक्रारी 24 तासांत सोडवल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांना आपल्या विभागातील समस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी पालिकेकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी 8169681697 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर नालेसफाईबाबत तक्रारी करण्यासाठी 9324500600 हा क्रमांक आहे. या क्रमांकावर मुंबईकरांना आपल्या भागातील नाल्याबाबत गाळ काढण्याबाबत तक्रारीसूचना करता येत आहेत. महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आलेल्या  777 तक्रारींपैकी मेजर नाल्यासंदर्भातील 191,  तरंगत्या कचऱयासंदर्भात 191 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अशी आहे सुविधा

नागरिकांनी 9324500600 या क्रमांकावर नाल्यातून गाळ काढण्याची तक्रार, सूचना याबाबत नेमके ठिकाण, विभाग, दिनांक आणि वेळ आदी माहिती पाठवल्यास, जीपीएस लोकेशनसह फोटो टाकल्यास संबंधित ठिकाणी पालिकेकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येते.

तक्रार, सूचना, अभिप्राय दाखल केल्यानंतर नागरिकांना तक्रार क्रमांक मिळतो आणि समस्या निवारण केल्यावर त्याचे छायाचित्रही तक्रारदाराला पाठवण्यात येते. हा क्रमांक हा केवळ माहिती पाठविण्यासाठी उपलब्ध असून यावर संभाषण करण्याची सुविधा उपलब्ध नाही.

अशा आल्या तक्रारी

कुर्ला 112

अंधेरी पश्चिम 111

चेंबूर पूर्व पश्चिम 111

खार, सांताक्रुझ 83

वडाळा, माटुंगा 59

भांडुप 44

वरळी 29

मालाड उत्तर 31

माहीम धारावी 32

घाटकोपर 15

मुलुंड 13