मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटसाठी 94 हजारांहून अधिक मतदारांची नोंद

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीसाठी यंदा 94 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विद्यापीठाने मतदार याद्या जाहीर केल्या असून एकूण नोंदणी केलेल्या 1 लाख 13 हजार 271 मतदारांपैकी 94 हजार 631 जणांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. तर तब्बल 18 हजार 640 जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यंदा मतदारांची संख्या 30 हजारांनी वाढली आहे.

बाद करण्यात आलेल्यांमध्ये अपुरी माहिती, कागदपत्रांतील त्रुटी आदी कारणे असल्याचे सांगण्यात आले. मुंबई विद्यापीठाने शिक्षक, व्यवस्थापन आदी सिनेटच्या निवडणुकीनंतर आज पदवीधर सिनेटच्या 10 जागांसाठी निवडणुकीसाठी मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठात महिनाभरात या निवडणुका होऊन विद्यापीठाला पदवीधर सिनेट मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुंबई विद्यापीठाने आज जाहीर केलेल्या मतदार याद्यांची माहिती विद्यापीठाच्या http://mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तसेच पात्र मतदारांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

2018मध्ये पदवीधर निवडणुकीत विद्यापीठातील पदवीधरच्या एकूण दहाही जागांवर युवासेनेचेच उमेदवार निवडून आले होते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांत निवडणूक पार पडते. पदवीधर निवडणूक 27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

दुबार नोंदणी

पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पार पडली तरीही काही मतदारांनी दोन अर्ज भरले आहेत. या मतदारांनी दोनदा अर्ज भरले असेल तरीही त्यांना केवळ एकदाच मतदान करता येणार आहे. ज्या मतदारांचे अर्ज बाद करण्यात आले होते त्यापैकी 250 जणांनी कुलगुरूंकडे अपील केले होते, मात्र यापैकी केवळ चारच जणांना पात्र ठरविण्यात आले आहे.