पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी असल्याचे खोटे मेसेज व्हायरल

मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजेश पंकाल यांच्या नावाने आज 28 जुलैला मुंबईतील शाळा पावसामुळे बंद असल्याचा खोटा मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झाला. या मेसेजमुळे दिवसभर मुंबईतील शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. काही शाळा सकाळ सत्रात बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र शाळा बंद असल्याचे कोणतेही परिपत्रक मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आले नव्हते, असा खुलासा महापालिकेने केला आहे. गुरुवारी 27 जुलै रोजी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुंबई महापालिका प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश पंकाल यांनी परिपत्रक जारी करून गुरुवारी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. याच परिपत्रकात फेरफार करून आज शुक्रवारी 28 जुलैलादेखील शाळा बंद असल्याचे भासविण्यात आले होते.