कोपरगावमध्ये कोहीनूर स्टेशनरी दुकानाला आग; लाखोंचे सामान जळून खाक

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत चौक कहार गल्ली येथील विशाल नानकर यांच्या  कोहिनूर स्टोअर्सच्या गोडाऊनला मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याने गोडाऊन मध्ये शालेय वह्या, पुस्तके, स्टेशनरीसह इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल आगीत भस्मसात झाला आहे. आग विझवण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दिगंबर शेलार यांच्यासह स्थानिक नागरिकांनी जीव धोक्यात घालत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश आले आहे.

मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास यशवंत चौक कहार गल्लीतील कोहिनूर स्टोअर्सच्या गोडाऊन मधून अचानक धूर निघत असल्याचे स्थानिक रहिवासी गणेश लकारे, धनंजय कहार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ कोहिनूर स्टोअर्सचे मालक विशाल नानकर यांना फोन वर संपर्क केला. तसेच शहर पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली. ही आग वाढतच असल्या कारणाने पालिकेच्या अग्निशामक विभागाला कळविले. मात्र, संपर्क होत नसल्याने गणेश लकारे, धनंजय कहार यानी स्वतः त्या विभागात जात अग्निशामक दलाला ही माहिती देत त्यांना सोबत घेऊन आले.

विशाल नानकर हे आपल्या गोडाऊनवर आले असता त्यांनी गोडाऊनचे कुलूप उघडले तेव्हा गोडाऊन मधून आगीने सर्वत्र पेट घेतल्याने आगीचे डोंबच डोंब बाहेर येत होते. संपूर्ण परिसरात धुरच धूर दिसत होता. मात्र अग्निशामक बंब येईपर्यंत ही आग वाढत असल्याने स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दिगंबर शेलार यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीव धोक्यात घालत पाणी टाकत आग विझविण्याचा प्रयत्न केला. नगरपालिका अग्निशामक दल आल्यानंतर ही आग विझविण्याचे काम सुरू केले. तब्बल दोन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र या लागलेल्या आगीत गोडाऊन मधील शालेय वह्या, पुस्तके, स्टेशनरी इतर सर्व असणारा लाखो रुपयांचा माल या लागलेल्या आगीत भस्मसात झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.