पेंग्विनची जोडी निघाली हैदराबादला; बदल्यात पालिकेला मिळणार मगर, कासव यासारखे प्राणी

>>देवेंद्र भगत

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन आता हैदराबादच्या प्राणिसंग्रहालयाची शोभा वाढवणार आहेत. या ठिकाणी असणाऱया 15 पेंग्विनमधील एक जोडी हैदराबादला दिली जाणार असून त्या बदल्यात मुंबईसाठी मगर, कासव यासारखे प्राणी मिळणार आहेत. 

पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. उद्यानात 2017 मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या वाढली असून दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता  एक लाखापासून सहा लाखांपर्यंत गेले आहे. राणीबागेत दररोज पाच ते सहा हजार तर शनिवाररविवार, सुट्टीच्या दिवशी येणाऱया पर्यटकांची संख्या आता 28 हजारांवर जाते. पेंग्विन आणल्यानंतर येणाऱया पर्यटकांची संख्या वाढली असून उत्पन्नातही वाढ झाली आहे. उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्रवेशासाठी लहान मुलांना प्रत्येकी 25 रुपये, मोठय़ांसाठी प्रत्येकी 50 रुपये आणि दोन मुलांसह दोन मोठय़ांसाठी चार जणांच्या कुटुंबाला एकत्रित 100 रुपयांत संपूर्ण उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पाहता येते. पेंग्विन पाहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. 

असे आहे उद्यान  प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण

या उद्यान व प्राणिसंग्रहालयात 15 पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातीचे 84 सस्तन प्राणी, 19 जातींचे 157 पक्षी आहेत. याशिवाय 256 प्रजातींचे आणि 6611 वृक्षवनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.

पेंग्विनने शोभा वाढवली

उद्यान व प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबटय़ा, हत्ती, हरणे, तरस, माकड, अस्वल, सरपटणारे प्राणी आणि शेकडो पशुपक्षी व दुर्मिळ, औषधी झाडे पाहता येतात. तर 26 जुलै 2016 रोजी कोरियावरून हंबोल्ट जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले. यामध्ये 3 नर व 5 मादी पेंग्विन होते. यांची संख्या आता 15 झाली आहे. पेंग्विनने संपूर्ण उद्यान व प्राणिसंग्रहालयाची शोभा वाढवली आहे. यातील एक जोडी हैदराबादला दिली जाणार आहे. यासाठी हैदराबाद प्राणिसंग्रहालयासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.