पेंग्विनमुळे 50 कोटींचा नफा, पण तुमच्या चित्त्यांचे काय झाले?

aaditya thackeray

परदेशातून मुंबईत आणलेल्या पेंग्विनचे उदाहरण देत टीका करणाऱ्या भाजप आणि मिंधे गटावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज जोरदार हल्ला चढवला. आमच्या पेंग्विनने मुंबई महानगरपालिकेला 50 खोक्यांचे उत्पन्न मिळवून दिले, पण जे गद्दारी करून पळून गेले ते स्वतःसाठी 50 खोके घेऊन पळाले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. पेंग्विनमुळे आज जिजामाता प्राणिसंग्रहालय नफ्यात आले आहे, भाजपच्या चित्त्यांचे काय, असा बोचरा सवालही त्यांनी केला.

मुंबईतील ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक मुद्दय़ावर आत्मविश्वासाने बोलताना विरोधकांच्या टीकेचा समाचारही घेतला. पेंग्विनबाबत बोलताना ते म्हणाले की, दरदिवशी 30 हजार लोक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात आणि पेंग्विन कसे आहेत हे पाहतात. आता पेंग्विनची स्थिती पाहा आणि चित्त्याची पाहा, असे ते म्हणाले. पेंग्विन परदेशातून हिंदुस्थानात आणत असताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आणले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा लढवणार का?

आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न करण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘पक्ष मला जी जबाबदारी देईल ती निवडणूक मी लढवेन. मी प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर करतो. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असेल,’ असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.

समोरासमोर होऊन जाऊ द्या!

आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांना जाहीर आव्हान दिले. समोरासमोर या, मी एकटा येतो आणि तुम्ही सर्वजण या. मी कोणताही कागद घेत नाही, तुम्ही कागदपत्रांसह या. होऊन जाऊ द्या. खोटं बोलून का पळालात यापासून सुरुवात करूया. नंतर उद्योग गुजरातला का पळवले, परदेश दौऱ्यांवर होणारा भरमसाट खर्च आणि इतर मुद्दय़ांवर चर्चा करूया, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजप ज्यांना घाबरते, त्यांना तुरुंगात टाकते

आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर होत असलेल्या ईडीच्या कारवायांबाबत केलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप ज्यांना घाबरते त्यांना तुरुंगात टाकते. मुंबईतील स्ट्रीट फर्निचर घोटाळय़ासह अनेक आरोप आम्ही केले आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? असा सवाल केला. शिवसेनेचे नेते-खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्या सुटकेचे आदेश पाहिले तर किती सूडबुद्धीने कारवाया सुरू आहेत हे लक्षात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

येतो सांगूनही मिंधे आलेच नाहीत

‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे पाठोपाठ सेशन होते. त्याऐवजी एकत्र सेशन करा असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते, पण एकनाथ शिंदे आलेच नाहीत. ते अचानक दिल्लीला गेल्याने येऊ शकले नाही, अशी माहिती आदित्य ठाकरे यांना देण्यात आली.

एकनाथ शिंदेंची केली पोलखोल

मुख्यमंत्री शिंदे हे दिवसाचे 18-18 तास काम करतात असे मिंधे गटाचे आमदार सांगतात. आदित्य ठाकरे यांनी मात्र शिंदेंची झोप नेमकी कशी आहे ते उलगडून सांगितले. शिंदे  हे सकाळी उठतच नाहीत त्यांच्या त्या सवयीमुळे दोन वेळा आपल्या फ्लाईट चुकल्या होत्या, असा अनुभव आदित्य ठाकरे यांनी सांगत एकनाथ शिंदे यांची पोलखोल केली.

मिंधे सरकार 100 टक्के भ्रष्ट

कर्नाटकमधील तत्कालीन भाजप सरकार 40 टक्के भ्रष्ट सरकार होते. पण महाराष्ट्रातील मिंधे सरकार 100 टक्के भ्रष्ट सरकार आहे आणि हे सरकार बिल्डर्स, पंत्राटदारांच्या संगनमताने चाललेय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

सरकारमधील एक जण पेंग्विनसारखा चालतो

आपल्याला पेंग्विन बोलणाऱ्यांनाही आदित्य ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. मी काही पेंग्विनसारखा चालत नाही. मिंधे सरकारमधील एक जण पेंग्विनसारखा चालतो. आता कोण चालतो ते तुम्हीच बघा. व्हिडीओ बघा, असा मिश्कील टोला त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता लगावला.