आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र, पालिका आयुक्तांच्या निलंबनासह केली ‘ही’ मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे निलंबन आणि गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत झालेल्या लाजिरवाण्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेने केलेली गोखले पुलाची पुनर्बाधणी ही देशाला लाजवेल अशी गोष्ट झाली आहे. यंत्रणांच्या या अपयशाची बातमी जगभरात पसरली आहे. तरीही दोन्ही यंत्रणा दोषारोपाच्या खेळात मग्न आहेत. या प्रकल्पातील मुख्य दायित्व असलेले महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करावेत. जेणेकरुन त्यांना या प्रकल्पात हस्तक्षेप करुन गडबड करता येणार नाही आणि निर्लज्जपणे करदात्यांच्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली तर बऱ्याच काळापासून रखडलेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला गृहीत धरत आयुक्तांची बदली करणे टाळत आहेत. गोखले पूल हे राजकारणी अधिकारी-कंत्राटदार यांच्या संगनमताचे ढळढळीत उदाहरण आहे. जिथे स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह पुलाला अनेकदा भेट दिली. या भेटींमध्ये त्यांना दोष दिसला नाही का? की मुद्दाम हा दोष निर्माण करण्यात आला होता. जेणेकरून आता दुसरा पूल तोडून पुन्हा बांधता येईल? असा सवाल करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अपेक्षित आहे आणि त्यामुळे चौकशीला सामोरे जाण्यासाठी आयुक्त आणि रेल्वेच्या संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केलेच पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली.