हुकूमशाही सरकारला मत देणार का? आदित्य ठाकरे यांचा घणाघाती सवाल

मोदी राज्यात कोण खुश आहे? शेतकरी खुश आहे? बेरोजगार खुश आहेत? महिला खुश आहेत? जे सरकार शेतकर्‍यांच्या वाटेत खिळे ठोकते, सिमेंटची भिंत उभी करते त्या हुकूमशाही सरकारला तुम्ही मत देणार का? असा घणाघाती सवाल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. ही निवडणूक देशातील लोकशाही वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गद्दार विरुद्ध निष्ठावंत, अशी ही लढाई असल्याचेही ते म्हणाले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी काढण्यात आलेल्या महारॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप तसेच मिंध्यांवर कडाडून हल्ला चढवला. ही निवडणूक परिवर्तन करणारी आहे. देशात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर त्यासाठी धाराशिव मतदारसंघातून ओमराजेंच्या हाती मशाल देऊन त्यांना दिल्लीला पाठवावेच लागेल. ‘अब की बार भाजप तडीपार’ हा नारा आता देशभरात दुमदुमत असून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपची हुकूमशाही मोडीत काढावीच लागेल असेही ते म्हणाले. बिल्किस बानोच्या अपराध्यांची आरती ओवाळणार्‍यांकडून काय अपेक्षा करणार, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्राबद्दल द्वेष का?

महाराष्ट्रात येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला पळविण्याचे काम भाजपने केले आहे. वेदांता, फॉक्सकॉनसह अनेक उद्योग भाजपमुळेच गुजरातला गेले. एवढेच काय क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामनाही गुजरातला पळवण्यात आला. हा सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झाला असता तर आपण नक्कीच जिंकलो असतो. महाराष्ट्राबद्दल मोदींच्या मनात एवढा द्वेष का आहे, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

आर्थिक ताकदीची नांगी ठेचायची आहे

धाराशिव मतदारसंघात धनशक्तीची नांगी ठेचून कडवट निष्ठावंतांच्या हाती विजयाची मशाल द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. मल्हार पाटलांनीच राष्ट्रवादी पोखरण्याचे काम २०१९ पासून सुरू होते याचा खुलासा केला आहे. त्यामुळे वेगळे सांगण्याची काही गरज नाही. गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ असल्याचेही आमदार पवार म्हणाले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साडेपाच हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

विश्वास सार्थ करून दाखवणार

गद्दार तानाजी सावंत यांनी प्रचंड थयथयाट केला, होते नव्हते तेवढे सगळे वजन वापरले. पण स्वत:च्या पुतण्याला तिकीट नाही आणू शकले, असा टोला उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच सूत्र आपण पुढे नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवणार असेही ते म्हणाले.

पेटती मशाल घेऊन हाती, वाजवू विजयाची तुतारी

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे पाप भाजपने केले आहे. याचा बदला घ्यायचा असेल तर महाविकास आघाडीला निवडून द्यावेच लागेल. आदित्य ठाकरे, रोहित पवार, माझ्यासह नवीन पिढी महाराष्ट्रात नेतृत्व करत आहे. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सारख्या तरुणाला निवडून देण्याची गरज आहे. पेटती मशाल घेऊन, वाजवू विजयाची तुतारी, अशी घोषणाच यावेळी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी दिली.