आता एकेक विकेट पडत जाणार! आदित्य ठाकरे यांचा मिंध्यांना टोला

Lok Sabha Election 2024 : माझ्याबरोबर गद्दारी करून बाहेर पडलेल्या एकाही जणावर मी अन्याय होऊ देणार नाही, अशी फुशारकी मारणाऱया मिंध्यांवर लोकसभा निवडणुकीत उमेदवाऱया बदलण्याची नामुष्की ओढवली. हिंगोलीत हेमंत पाटील यांना बदलले, वाशीममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट केला. लोकसभेत हे हाल आहेत तर विधानसभेला काय होणार… आता एकेक विकेट पडत जाणार, असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने प्रचंड भगवी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप तसेच मिंध्यांवर कडाडून हल्लाबोल केला. शिवसेनेने या लोकांना काय कमी केले होते? सर्वसामान्य असलेल्यांना खासदार, आमदार बनवले. पण आज यांच्यावर उमेदवारी मिळवण्यासाठी दहा-दहा तास प्रतीक्षा करण्याची वेळ आली. मिंध्यांच्या दारात थांबूनही उमेदवारी मिळाली नाही. हिंगोलीत चेहरा बदलण्याची वेळ आली. यवतमाळ-वाशीममध्ये तेच चित्र. अजूनही एक-दोन जणांवर अशीच वेळ येणार आहे. मग मिंध्यांसोबत जाऊन या लोकांना मिळाले तरी काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱयांवर मोदी सरकारने प्रचंड अन्याय केला. शेतकऱयांचे आंदोलन जुल्मी पद्धतीने दडपण्याचा प्रयत्नही केला.

महाराष्ट्रात येत असलेले उद्योग गुजरातला पळवले. महाराष्ट्राने असे कोणते पाप केले? असा संतप्त सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. माझ्यासोबत बाहेर पडलेल्या कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशा वल्गना मिंध्यांनी केल्या होत्या. माझ्यासोबतचा एक जण जरी पडला तरी राजीनामा देईन, अशी लोणकढी थापही मिंध्यांनी मारली.

लोकसभा निवडणुकीत मिंध्यांचे असे हाल झाले आहेत, तर विधानसभेत 40 गद्दारांचे काय होणार, आता एक-एक विकेट पडत जाणार, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार राजेश एकडे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार राहुल बोंद्रे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, जालिंदर बुधवत आदींची उपस्थिती होती.

देशाचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा

सभेत गजानन देशमुख या शेतकऱयाने मोदी सरकारचे वस्त्रहरण केले. पंतप्रधान मोदी यांनी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देण्याचा वायदा केला होता. पण आपल्या खात्यात पाच रुपयेही आले नाहीत. कोणी काही द्यायचे म्हटले की, त्यांच्या मागे मोदी ईडी लावतात. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना पन्नास खोक्यांची लालूच दाखवून नेले. त्यांनी तेथून जीव वाचवून पळ काढला. माझ्या घरची परिस्थिती नाजूक आहे. दोन एकर जमीन आहे. या भाजपवाल्यांनी मला काही दिले नाही. कामगार योजनेचा माझा अर्जही गहाळ केला. देशाचे वाटोळे करणाऱयांना यंदा घरीच बसवणार आणि खेडेकर यांनाच निवडून देणार, असे ते म्हणाले.