अल्पवयीन मुलाच्या हत्येतील सहआरोपी महिलेला जामीन

लग्न करता यावे म्हणून प्रियकराच्या दोन वर्षाच्या मुलाची हत्या करण्यास त्याला प्रवृत्त केल्याचा आऱोप असलेल्या 21 वर्षीय तरूणीला नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

याचिकाकर्ती महिला मागील नऊ महिन्यांपासून कारागृहात आहे. आरोपी प्रियकराने नोंदवलेला जबाब हा एकमेव पुरावा तिच्याविरोधात आहे. मात्र, त्याच्या जबाबात ठोस असे काहीच आढळले नसल्याचे निरीक्षण न्या. निजामुद्दीन जमादार यांनी महिलेला जामीन देताना नोंदवले. याचिकाकर्तीसोबत आपले प्रेमसंबंध होते आणि तिच्याच सागंण्यावरून आपण हत्येसारखे टोकाचे पाऊल उचल्याचा दावा सहआरोपी (प्रियकराने) केला होता. मात्र, याचिकाकर्तीविरोधातील आरोप हे क्षुल्लक असून त्यात ठोस असे काहीच नाही, तसेच याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे याचिकाकर्ती जामीनास पात्र असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

आरोपी रेहमतली अन्सारी आपल्या मुलासह भावाच्या मुलांना 18 एप्रिल 2023 रोजी चॉकलेट आणण्यासाठी सोबत घेऊन गेला. पुढे भावाच्या मुलांना घरी सोडून स्वतःच्या दोन वर्षीय मुलासोबत पुढे गेला. नंतर पत्नीने रेहमतलीकडे मुलाबद्दल विचारणा केली असता आपल्याला काहीच माहिती नसल्याचे रहमतलीने सांगितले. तसेच कुटुंबीयांसोबत मुलाचा शोध सुरू केला. मात्र, रेहमतलीला पत्नीपासून मुक्तता हवी असल्याची माहिती रेहमतलीच्या भाऊ किस्मतलीला एका मित्राने दिली. दुसर्‍या दिवशी रेहमतीच्या मुलाचा मृतदेह गोणीत सापडला आणि किस्मतलीने मुंबईतील शाहुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून रेहमतलीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित असूनही रेहमतलीचे तीन वर्षांपासून 21 वर्षीय तरूणीशी विवाहबाह्य संबंध होते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे असल्याने रेहमतलीने हे अमानुष पाऊल उचलले होते. जर त्याने आपल्या मुलाला मारले तर त्याची पत्नी त्याला सोडून जाईल आणि तो त्याच्या प्रेयशीशी लग्न करेल, असा त्याचा प्लॅन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रेहमतलीच्या कथित जबाबाच्या आधारे याचिकाकर्तीला याप्रकरणी खोटे गोवण्यात आले आहे. रेहमतीच्या जबाबाशिवाय तिच्याविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा नाही. तिने रेहमतीला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली तिला जामीन नाकारण्यात आल्याचा युक्तिवाद तिच्यावतीने अँड. ओंकार चितळे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने याचिकाकर्तीला जामीन मंजूर केला.