पुरस्कार सोहळ्यावेळी बोल्ड कपडे घातल्याने हेमांगी कवी ट्रोल

लॉकडाऊनमध्ये आपल्या ब्राविषयक पोस्टने चर्चेत आलेली अभिनेत्री हेमांगी कवी पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. एका पुरस्कार सोहळ्यात अतिशय बोल्ड पद्धतीचे कपडे घातल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

झी या वाहिनीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गए’ या मालिकेत भवानी चिटणीस नावाचं पात्र साकारत आहे. याच वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या रिश्ते पुरस्कारासाठी हेमांगीला सर्वोत्कृष्ट आई या विभागात पुरस्कार मिळाला. आपल्याला पुरस्कार मिळताना समोर बसलेल्या कलाकारांमधून जय महाराष्ट्र अशी घोषणा ऐकू येणं हे खूप भारी असल्याचं मनोगत व्यक्त करणारी पोस्टही हेमांगीने शेअर केली होती.

मात्र, त्या पुरस्कार सोहळ्यावेळी घातलेल्या बोल्ड फ्युजन पेहरावामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. हेमांगीने साडीचं फ्युजन करत डीप नेक ब्लेझर सोबत घातला होता. या कपड्यांमुळे ती ट्रोल होताना दिसत आहे. अशा प्रकारचे कपडे घालून नेमकं काय साध्य करायचं आहे, मराठी संस्कृती मातीत मिळवली अशा अर्थाच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून येताना दिसत आहेत.

लॉकडाऊनच्या वेळीही हेमांगीने टाकलेल्या बाई, बुब्ज आणि ब्रा या पोस्टनंतर नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी तिचं मत बरोबर असल्याचं म्हटलं होतं तर अनेकांनी तिच्या या वक्तव्यावर टीकाही केली होती.