Video – चंद्रानंतर ‘इस्त्रो’चे मिशन सूर्य, श्रीहरी कोटा येथून ‘आदित्य एल-1’ अंतराळात झेपावले

‘हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थे’चे (इस्रो) महत्त्वाकांक्षी सूर्य मिशन ‘आदित्य एल-1’चे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी PSLV XL रॉकेटद्वारे श्रीहरी कोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ‘आदित्य एल-1’ला लाँच केले.

‘आदित्य एल-1’ मिशन जवळपास 4 महिन्यांत पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर लँगरांजे पॉइंट-1 म्हणजेच एल-1 पॉइंटपर्यंत पोहोचेल. एल-1 पॉइंटच्या चारही बाजूने फिरून सूर्यावरील उठणाऱ्या तुफानाला समजून घेईल. याशिवाय मॅग्नेटिक फील्ड आणि सोलर विंडसारख्या वस्तूंचा अभ्यास करेल. आदित्य एल-1मध्ये प्रयोगासाठी 7 पेलोड बसवले आहेत. आदित्य एल-1 हे सूर्याच्या अभ्यासासाठीचे हिंदुस्थानचे पहिले मिशन आहे. हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतीच चांद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. यानंतर लगेच सूर्य मोहीम हाती घेतली आहे.

‘आदित्य एल-1’च्या लाँचिंगआधी शुक्रवारी ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आंध्र प्रदेशामधील चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आदित्य एल-वन मिशन यशस्वी व्हावे असे साकडे एस. सोमनाथ यांनी या वेळी देवाला घातले. याआधी 28 ऑगस्टला एस. सोमनाथ यांनी तामीळनाडूच्या सुल्लुरपेटा येथील श्री चेंगलम्मा परमेश्वरी मंदिरात पूजा केली होती. मिशनच्या लाँचिंगआधी इस्रोचे वैज्ञानिक या मंदिरात येतात. ही परंपरा गेल्या 15 वर्षांपासून सुरू असल्याचे ते या वेळी म्हणाले.