चंद्रानंतर आता सूर्याचे वेध! ‘आदित्य’ 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी झेपावणार

चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानतंर आता इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सूर्याचा अभ्यास करण्याची अवघड मोहीम हाती घेतली आहे. इस्त्रोचे ‘आदित्य एल-1’ हे यान 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे.

सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोन थराची सद्यस्थिती, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम अशा अनेक गोष्टींचा अभ्यास सौरमोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यू.आर. राव उपग्रह केंद्रात तयार केलेला उपग्रह दोनच आठवडय़ांपूर्वी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या स्पेस पोर्टवर पोहोचवण्यात आला आहे. 2 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशने पाठवला जाणार असल्याची  माहिती इस्रोने एक्सवरून (ट्विटर) दिली आहे.

पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरचा प्रवास

एल-1 हा सूर्य आणि पृथ्वीमधील एक बिंदू असून हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. तिथपर्यंत इस्रोचे अवकाशयान जाणार आहे. सूर्याच्या भोवतालची परिस्थिती आणि इतर संशोधन करण्यासाठी यानात सात वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे बसवण्यात आली आहेत. तसेच 7 वेगवेगळे पेलोड पाठवण्यात येणार आहेत. या पेलोडच्या म्हणजेच यानावरील यंत्रणेच्या माध्यमातून सौरवादळांसह इतर बाबींच्या अभ्यास करण्यात येणार आहे.

थेट प्रक्षेपण पाहता येणार

नागरिकांना आदित्य एल-1चे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. त्यासाठी https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp या लिंकवर नोंदणी करावी लागेल.  श्रीहरिकोटा येथील लाँच ह्यू गॅलरीतून हे प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे.

चांद्रयान-3च्या रोव्हरच्या मार्गात भला मोठा खड्डा

चांद्रयान-3च्या प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात आता अनेक आव्हाने येणार आहेत. त्यापैकी खड्डय़ाच्या रूपाने आलेले पहिले आव्हान रोव्हरने पार केले. प्रज्ञान रोव्हर त्याच्या स्थानाच्या 3 मीटर पुढे 4 मीटर व्यासाच्या क्रेटरवर पोहोचले. त्या वेळी ते एका मोठय़ा खड्डय़ाजवळ पोहोचले होते. या वेळी सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला; परंतु इस्रोने कमांड देऊन रोव्हरला नवीन मार्गावर सुरक्षित नेले आणि इस्रोच्या नियंत्रण कक्षात बसलेल्या वैज्ञानिकांचा जीव भांडय़ात पडला. इस्रोने याबाबतचे काही फोटो एक्सवरून शेअर केले आहेत.