एनईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे आता पीएचडीला प्रवेश, विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

प्रातिनिधिक फोटो

पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांना विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेला बसावे लागणार नाही. शैक्षणिक सत्र 2024-25 पासून नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी) स्कोअरच्या आधारे पीएचडीलादेखील प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याविषयीची घोषणा केली आहे.

यूजीसी काऊन्सिलच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत पीएचडी प्रवेशासाठी नवीन नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. या नियमांनुसार आता एनईटी पात्रताधारक तीन श्रेणींसाठी पात्र असतील. एनईटीमध्ये सर्वाधिक गुण असलेले विद्यार्थी श्रेणी-1 मध्ये असतील. ते पीएचडी प्रवेश आणि फेलोशिपसह जेआरएफ, असिस्टंट प्रोफेसरशिपसाठीदेखील पात्र असतील. त्यांना पीएचडी प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागेल. जी यूजीसी नियमन-2022 वर आधारित असेल. त्यानंतर अधिक गुण असलेले विद्यार्थी दुसऱया श्रेणीत येतील. हे विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी प्रवेशासाठी पात्र मानले जातील. परीक्षेत उत्तीर्ण पण कमी टक्केवारी असलेले विद्यार्थी श्रेणी-3 मध्ये असतील. ते फक्त पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील. पीएचडी प्रवेशासाठी, श्रेणी-2 आणि श्रेणी-3 मधील उमेदवारांची निव्वळ टक्केवारी 70 टक्के वेटेजमध्ये ग्राह्य धरली जाईल आणि मुलाखतीला 30 टक्के वेटेज असेल. या दोन्ही श्रेणींमध्ये एनईटी स्कोअर फक्त एक वर्षासाठी वैध असेल. जर ते या कालावधीत पीएचडीसाठी नावनोंदणी करू शकले नाही तर त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. उमेदवाराला पुन्हा एनईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.