चाणाक्ष हिंदुस्थानी मतदारांनी भल्याभल्या नेत्यांना पाणी पाजले आहे, जरा थांबा; सॅम पित्रोदा यांचा सबुरीचा सल्ला

हिंदुस्थानी मतदार चाणाक्ष आहेत, हुशार आहेत. त्यांना गृहित धरता येत नाही. भल्याभल्यांना त्यांनी धक्क्याला लावले आहे. इंदिराजींनी आणीबाणी लादल्यावर याच मतदारांनी त्यांना सत्तेवरून पायउतार केले होते. तेव्हा निवडणुकीच्या निकालांचे भाकीत करण्याची इतक्यातच घाई करू नका, असा सबुरीचा सल्ला इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील दूरसंचार क्रांतीचे एक प्रणेते सॅम पित्रोदा यांनी दिला आहे.

निवडणूक निकालांसाठी फक्त दोन महिनेच तर वाट पाहायची आहे. तेव्हा काय होईल याचा अंदाज लावायची आताच घाई कशाला? हिंदुस्थानी मतदारांना धक्का देण्याची सवय आहे. तेव्हा राजकीय पक्षांवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवायला हवा, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडी चांगली कामगिरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्यावर त्यांना मतदारांनी सत्ताभ्रष्ट केले होते. नंतर त्या परतल्याही. त्यामुळे हिंदुस्थानी मतदारांच्या बुद्धिमत्तेला कमी लेखू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

 

काँग्रेसचा जाहीरनामा आदर्श

काँग्रेसचा जाहीरनामा हा देशातील जनतेसाठी आदर्श जाहीरनामा आहे. त्यातील विचार, हमी आणि संकल्प याची ग्वाही देतात, असे ते म्हणाले.

 

मतदारांना काय वाटते ते महत्त्वाचे

जर हिंदुस्थानी मतदारांना वाटत असेल की, त्यांना लोकशाहीप्रधान देशात राहायचे आहे. त्यांना हुकूमशाही नसलेल्या वातावरणात राहायचे आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे. लवचिकता हवी आहे. त्यांना त्यांचा आवडता धर्म पाळायचा आहे. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करायचे आहे. जर त्यांना वाटत असेल की रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे तर ते त्यानुसार मतदान करतील. त्यामुळे राजकीय पक्षांपेक्षा हिंदुस्थानी मतदारांवर विश्वास ठेवा, असे सॅम पित्रोदा म्हणाले.

काँग्रेससह इंडिया आघाडीची जोरदार लढत

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते जोरदार लढत देत आहेत. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षातील अनेक जण मेहनत घेत आहेत, असे पित्रोदा म्हणाले.