कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला विक्रेत्यांना सापत्न वागणूक, भाजीपाला आणि फळविक्रेत्यांना वेगवेगळा न्याय

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका निर्णयाने शहरात भाजीपाला विक्रेत्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे दिसून येत आहे. शहरात भाजीपाला विक्रीसाठी दररोज तालुक्यातील विक्रेते येत असतात. आधी भाजीपाला विक्री घरणीकर रोडवर केली जात असे, मात्र रस्त्यावरील वाहतुकीचे कारण देत कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी विक्रेत्यांना नाथ रोडवर असलेल्या जागेत स्थलांतर केले. याच निर्णयात बाजार समिती परिसरात असलेल्या फळ विक्रेत्यांनाही स्थलांतरित केले जाणार होते, मात्र तसे केले गेले नसल्याने याबाबत संभाजी ब्रिगेडने एक निवेदनही दिले होते.

गुरुवार, दि.3 रोजी फळविक्रेत्यांना त्यांच्या जागेवरून हटविले नसल्याने बस स्थानक ते जिजामाता उद्यान रस्त्यावर पुन्हा बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यानी पोलिसांच्या मदतीने उठविले. फळविक्रेते मात्र मोंढा भागातच ठेवल्याने भाजीपाला विक्रेत्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. एकीकडे शहरात भरणारा आठवडी बाजार व दररोजचा भाजीपाला बाजार बस स्थानक ते जीजामाता उद्यान रस्त्यावरून उठवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाथ रोडवरील मोकळ्या मैदानावर हलविण्यात आला, मात्र बाजार समितीच्या परिसरात असलेले फळविक्रत्यांचे हातगाडे तेथेच ठेवल्याने मोंढा भागात वाहतुकीची कोंडी कायम होत आहे.

फळविक्रेत्यांनाही भाजीपाला विक्रीसाठी दिलेल्या जागेशेजारी हलविण्यात यावे, अशी मागणी करूनही ते हलविण्यात आले नसल्याने व बाजार समितीच्या नवीन जागेत बसण्यासाठी ओटे, पाण्याची सुविधा नसल्याने गुरुवार, दि.3 ऑगस्ट रोजी सकाळी भाजीपाला विक्रेत्यांनी धरणीकर रोडवर भाजीपाला विक्री सुरू केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी धरणीकर रोडवर पोलीस बंदोबस्तात येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना त्या ठिकाणाहून उठवल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.