हरिनामाच्या गजरात रंगला रथोत्सव, अलंकापुरीत आज 728 वा संजीवन समाधी दिन सोहळा

ज्ञानोबा माऊली अन् विठ्ठल विठ्ठलाच्या जयघोषात रविवारी अलंकापुरीत रथोत्सव रंगला. रथदर्शनासाठी भाविक, वारकऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, (सोमवारी) माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा होणार आहे.

श्री विठ्ठल हरिनाम गजरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव रविवारी (दि.10) भाविक, वारकऱ्यांचे हरिनाम गजरात झाला. रथोत्सवात श्रींचा चांदीचा मुखवटा पूजा, आरती दर्शनास भाविकांनी गर्दी केली. हरिनाम गजरात मिरवणूक प्रदक्षिणा श्री विठ्ठल जय घोषात झाली. आळंदीतील ग्रामस्थ युवक, तरुणांनी रथ हाताने ओढत नामजय घोषात रथोत्सव साजरा केला. रथोत्सवापूर्वी श्रींची पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर गोपाळपुरात आणली.

यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, विवेक इनामदार चोपदार राजाभाऊ रंधव, बाळासाहेब चोपदार, योगीराज कुऱहाडे, मंगेश आरु, योगेश आरू, बाळकृष्ण मोरे, गोविंद ठाकूर तौर, ज्ञानेश्वर घुंडरे, भीमराव घुंडरे, आळंदी देवस्थानचे सेवक, कर्मचारी, वारकरी भाविक उपस्थित होते.

द्वादशीनिमित्त विविध धर्मशाळा, मठ, मंदिरांत अखंड हरिनाम उत्साहात झाला. हजारो भाविक, वारकरी यांना ज्ञानदानासह अन्नदान सेवा झाली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास बालवडकर यांनी नियोजन केले. आळंदी देवस्थान मध्ये श्रींचे संजीवन समाधी दिन सोहळ्याची तयारी सुरू असून मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत लक्षवेधी पुष्प सजावट केली जात आहे.