केजरीवाल प्रकरणातील माफीच्या साक्षीदाराच्या वडिलांना उमेदवारी

गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असलेल्या लोकप्रतिनिधी, आरोपींना पक्षात सामावून घेण्याचे भाजप आणि मित्रपक्षांचे धोरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरूच आहे. दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने तुरुंगात डांबले. या प्रकरणीतील एक आरोपी तसेच नंतर माफीचा साक्षीदार झालेल्या राघव रेड्डी याचे वडील मगुंता रेड्डी यांना भाजपचा मित्रपक्ष तेलुगू देसमने दिलेली लोकसभेची उमेदवारी म्हणजे केजरीवाल प्रकरणात दिलेले बक्षीस असल्याचे बोलले जात आहे.

रेड्डी पिता-पुत्रांनी गेल्या महिन्यात वायएसआर काँग्रेसमधून तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला होता. मगुंता रेड्डी हे चार वेळा ओंगोलचे खासदार राहिले आहेत. आपल्या मुलाला ओंगोलमधून उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता, मात्र त्यांच्या मुलाचे नाव दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्यात आल्याने तेलुगू देसम पक्षाने श्रीनिवासुलू रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली. राघव रेड्डी याला ऑक्टोबर 2023 मध्ये जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर तो या प्रकरणातील माफीचा साक्षीदार झाला.