कोकणचो राजा इलो, पेटीचा भाव 12 हजार

मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील आंबा खवय्यांना भुरळ घालणाऱ्या कोकण हापूसच्या पाच पेट्या आज एपीएमसी मार्केटमध्ये आल्या. देवगडमधून आलेल्या या आंब्याच्या पेटीला 12 हजार रुपयांचा दर मिळाला. डिसेंबर महिन्यात एपीएमसी मार्केटमध्ये हापूसची पहिली पेटी आली होती. त्यापाठोपाठ जानेवारी महिन्यात आता पाच पेट्या आल्यामुळे व्यापाऱ्यांनी हापूसचे जोरदार स्वागत केले. या पेट्यांची पूजा केल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली.

देवगड आणि रत्नागिरी परिसरातील आंबा बागायतदारांनी आज पाच पेट्या एपीएमसीच्या फळ बाजारात पाठवल्या. या पेट्यांची नारायण पानसरे, अमोल शिंदे, बापूसाहेब भुजबळ आणि मारुती कोकणे यांच्या गाळ्यांवर पूजा करण्यात आली. त्यानंतर या आंब्याची विक्री झाली. आज आलेल्या आंब्याच्या पेटीला सुमारे 12 हजार रुपयांचा दर मिळाला. इतका विक्रमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डिसेंबर पाठोपाठ आज दुसऱ्यांना हापूस आंबा मार्केटमध्ये आला असला तरी प्रत्यक्षात हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना हापूसची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

देवगड परीसरातील हापूसचा हंगाम सर्वात प्रथम सुरू होतो. त्यानंतर रत्नागिरी आणि अलिबागमध्ये आंबा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होते. देवगड परिसरातील कातवण येथील शेतकरी सागर वातकर यांच्या बागेतील आंबा आज मार्केटमध्ये डेरेदाखल झाला. उद्याही देवगड हापूसच्या काही पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येणार आहेत. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटबरोबर कोकणातील शेतकऱ्यांनी पुणे आणि राज्यातील अन्य बाजारपेठांमध्येही आंब्याच्या पहिल्या मुहूर्ताच्या पेट्या पाठवल्या आहेत.