मणिपूर व्हिडीओ : अमित शहा यांचा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना फोन; घटनेची घेतली माहिती, कडक कारवाईचे दिले निर्देश

गेल्या दोन महिन्यांपासून दोन गटांतील हिसांचारामुळे मणिपूर धगधगत असतानाच पुरुषांच्या एका टोळीनं दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वोच्च न्यायालयानं देखील केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

फोन वरून गृहमंत्र्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. राज्याची राजधानी इम्फाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही भीषण घटना घडली. दोन आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली आणि शेतात सामूहिक बलात्कार करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.